Latest

Lok Sabha Election 2024 : कोल्हापूरच्या जागेसाठी काँग्रेसचा आग्रह

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ काँग्रेसलाच मिळाला पाहिजे, अशी आग्रही मागणी पुणे येथे झालेल्या काँग्रेसच्या विभागीय बैठकीत कोल्हापूरच्या कार्यकर्त्यांनी केली. बैठकच्या पोस्टरवर काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते व कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांचा फोटो नसल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी नेत्यांना जाब विचारला. पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूरसह सांगली, सेालापूर या तीन जागा काँग्रेसला मिळाव्यात, असा आग्रह इंडिया आघाडीच्या बैठकीत धरला जाईल, अशी ग्वाही काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथाला यांनी दिली. (Lok Sabha Election 2024)

पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा आढावा घेण्यासाठी काँग्रेसची विभागीय बैठक पुणे येथे आयोजित करण्यात आली होती. सतेज पाटील यांचा फोटो पोस्टरवर नसल्याने जिल्ह्यातील कार्यकर्ते संतप्त झाले. याबाबत काँग्रेसचे शहर अध्यक्ष सचिन चव्हाण, तौफिक मुल्लाणी, शशांक बावसकर आदींनी नेत्यांना जाब विचारला. त्यावर नेत्यांनी सारवासारव केली. कोल्हापूरची जागा काँग्रेसला मिळाला पाहिजे, अशी मागणी नेत्यांनी केली.

यापूर्वीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा उमेदवार काँग्रेसच्या सहकार्याने निवडून आला होता. तर त्यापूर्वी अपक्ष निवडून आलेले सदाशिवराव मंडलिक यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला होता. त्यामुळे काँग्रेसचाच या जागेवर हक्क असल्याची मागणी करून कार्यकर्त्यांनी उमेदवारी कोणालाही द्या; पण ती काँग्रेसलाच मिळाली पाहिजे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना जरी उमेदवारी दिली, तरी त्यांना आम्ही निवडून आणू. अशी भूमिका कार्यकर्त्यांनी मांडली. जिल्ह्यातील सर्व बूथ कमिटी, मंडल व वॉर्ड कमिटी दि. 5 फेब—ुवारीपर्यंत स्थापन करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. (Lok Sabha Election 2024)

बैठकीस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे व पृथ्वीराज चव्हाण, महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथाला, जिल्ह्यातील आ. ऋतुराज पाटील, आ. जयश्री पाटील, आ. जयंत आसगावकर आदी उपस्थित होते.

नाना, तुम्ही उभारला तरी कोल्हापुरातून निवडून आणू

लोकसभेच्या कोल्हापूरच्या जागेचा आग्रह पाहून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लोकसभेसाठी आ. सतेज पाटील यांनाच आपण उमेदवारी देऊ, असे म्हणाले. यावर शहर अध्यक्ष सचिन चव्हाण यांनी नाना, तुम्ही जरी कोल्हापुरातून उभा राहिलात तरी निवडून आणू, असे सांगितले.

SCROLL FOR NEXT