Latest

काँग्रेसचा विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेतेपदावरही दावा! सतेज पाटील, राजेश राठोड आणि अभिजित वंजारी यांच्यात चुरस?

दिनेश चोरगे

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पदही मिळविण्याचे प्रयत्न काँग्रेसच्या गोटातून दिल्ली दरबारी सुरू झाले आहेत. सध्या शिवसेनेचे अंबादास दानवे यांच्याकडे असलेले हे पद काँग्रेसने आपल्याकडे घेतल्यास उद्धव ठाकरे काय भूमिका घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

संख्याबळाच्या आधारे विरोधी पक्षनेते पद आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी पक्षातील आमदारांनी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र पाठविले. पत्रावर विधानपरिषदेच्या 9 पैकी 6 आमदारांच्या सह्या आहेत. यात नागपूरचे अ‍ॅड. अभिजित वंजारी, प्रज्ञा सातव, वजाहत मिर्झा, राजेश राठोड, धीरज लिंगाडे, सुधाकर अडबाले यांच्या स्वाक्षर्‍या आहेत. या पदासाठी काँग्रेसमध्ये सतेज पाटील, राजेश राठोड आणि अभिजित वंजारी यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. विधानपरिषदेत सध्या काँग्रेसचे 9, राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे 4, राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे 5, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे 8, शिवसेना शिंदे गटाचे 3 जण सदस्य आहेत. आता काँग्रेस हे पद घेणार की मोठा भाऊ म्हणून शिवसेनेकडेच हे पद ठेवत मविआचा राजधर्म पाळणार, हे येणारा काळ सांगणार आहे.

SCROLL FOR NEXT