Latest

चित्रकलेच्या एलिमेंटरी परीक्षेतील संकल्प चित्र प्रश्नपत्रिकेत गोंधळ; कलाध्यापक संघ महामंडळाकडून चौकशीची मागणी

backup backup

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र शासनाकडून दरवर्षी शासकीय रेखा कला परीक्षा घेतली जाते. यावर्षी ही परीक्षा चार तारखेपासून सुरू झालेली असून सात तारखेला परीक्षा संपणार आहे. मात्र शासकीय रेखा कला परीक्षा अर्थात एलिमेंटरी ग्रेड परीक्षेतील संकल्प चित्र विषयाच्या प्रश्नपत्रिकेत गोंधळ झाला असून या सर्व प्रश्नपत्रिकांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राज्य कलाध्यापक संघ महामंडळाकडून करण्यात आली आहे.

या संदर्भात महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळाचे सरचिटणीस दिगंबर बेंडाळे यांनी शासनाचे एका पत्राद्वारे लक्ष वेधले आहे. एलिमेंट्री ड्रॉईंग ग्रेड परीक्षेला 4 लाख 46 हजार 702 विद्यार्थी, तर इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षेला 3 लाख 68 हजार 393 विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. या परीक्षेसाठी प्रत्येक विषयाच्या मराठी, हिंदी, इंग्रजी व उर्दू या चार माध्यमातून प्रश्नपत्रिका दिल्या जातात. 5 सप्टेंबर रोजी संकल्पचित्र (नक्षीकाम) या विषयाचा पेपर होता. या विषयाच्या चार भाषांमधून प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना देण्यात आल्या. मात्र या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रत्येक भाषेतील प्रश्नपत्रिका वेगवेगळी आहे. संकल्प चित्र काढण्यासाठी घटक दिले जातात. त्यांचा वापर करून आपल्या कल्पनाशक्तीने संकल्पचित्र तयार करून ते रंगवायचे असते. इंग्रजी भाषेतील प्रश्नपत्रिका जे घटक दिले त्यामध्ये पान आणि फुलांचे अलंकारिक आकार दिले आहेत. तर मराठी विषयाच्या प्रश्नपत्रिका पान व फुलांचे किंवा पक्षांचे अलंकारिक आकार दिलेले आहेत. मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील प्रश्नपत्रिकेत आवडीचे भौमितिक आकार दिलेले आहेत. तर उर्दू भाषेच्या प्रश्नपत्रिकेत छोटे-मोठे दोन चौरस, तर वेगवेगळ्या आकाराचे तीन वर्तुळे देण्यात आलेले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे.

या सर्व प्रकारामुळे परीक्षा विभागात कारभार कसा चालतो हे दिसून येत आहे. प्रश्नपत्रिका प्रिंटिंगला जाण्यापूर्वी त्याचे प्रूफ रीडिंग घेतले जाते. तरीही अशा प्रकारच्या गंभीर चुका होत असतील तर संबंधितांवर कारवाई होणे गरजेचे आहे. याशिवाय कला संचालनालयाच्या परीक्षा विभागाकडून गेल्या अनेक वर्षापासून परीक्षा केंद्रावरील मेहनताना अदा करण्यात आलेला नाही. तसेच मेरिटमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांना त्यांची प्रमाणपत्रे किंवा त्यांना बक्षिसाची रक्कमही अदा करण्यात आलेली नाही. या मुद्द्यांबाबत अनेक वेळा पत्रव्यवहार करूनही काहीही फायदा होत नाही. वरिष्ठांनी याची गांभीर्याने दखल घेणे आवश्यक असल्याचे महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळाचे सरचिटणीस दिगंबर बेंडाळे यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT