Latest

मुंबई : आता नगरसेवकांची कामे अभियंत्यांकडे !

Arun Patil

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : नगरसेवक नसल्यामुळे रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची तक्रार करायची कुठे ? असा प्रश्न मुंबईकरांना पडला आहे. मुंबईकरांचा हा प्रश्न सोडवण्यासाठी आता पालिकेने प्रत्येक प्रभागाची जबाबदारी अभियंत्यांवर सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी 227 प्रभागांत अभियंत्यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त होतील, असा दावा करण्यात येत आहे.

सध्या उपनगरातील एका विभाग कार्यालयावर सरासरी 10 ते 18 प्रभागांची जबाबदारी आहे. मुंबई शहर व उपनगरांत पालिकेची 24 विभाग कार्यालये असून या कार्यालयांच्या अंतर्गत 227 प्रभाग येतात. त्यामुळे या विभाग कार्यालयातील सहाय्यक आयुक्त यांना प्रत्येक विभागात जाऊन रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची समस्या सोडवता येत नाही. खड्ड्यांची तक्रार केल्यानंतर तो खड्डा बुजविण्यासाठी अनेकदा दोन ते तीन दिवस लागतात. खड्ड्यांसंदर्भात कोणी तक्रार केली नाही, तर तो खड्डा अनेक दिवस जैसे थे राहतो. त्यामुळे खड्ड्यांची समस्या कायम राहते.

महापालिका अस्तित्वात असताना नगरसेवक आपआपल्या प्रभागातील खड्ड्यांची तक्रार पालिका प्रशासनाकडे करत होता. त्यामुळे तो खड्डा तातडीने बुजवणे पालिकेला शक्य होत असे. यासाठीच आता 227 प्रभागांत प्रत्येकी एक कनिष्ठ अभियंत्याची नियुक्ती करण्यात आली आहे.

या अभियंत्यांवर खड्ड्यांसंदर्भात जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. सर्व रस्त्यांवर स्वतःहून नियोजन, पाहणी आणि सर्वेक्षण करून खड्डे बुजवणे हे कनिष्ठ अभियंत्याचे बंधनकारक कर्तव्य आहे. त्याशिवाय नेमून दिलेल्या प्रभागातील रस्त्यांवर खड्डा पडणार नाही, याची दक्षता त्याला घ्यावी लागेल. प्रभागात फेरफटका मारून रस्त्यावर कुठे खड्डा पडला का, याची शहानिशा करणे. नागरिकांनी केलेल्या तक्रारीचे तातडीने निवारण करणे, आदी जबाबदारीही अभियंत्यांना पार पाडावी लागणार आहे.

SCROLL FOR NEXT