Latest

कोल्हापुरात कोम्बिंग ऑपरेशन; 10 गुंडांच्या घरांसह अड्ड्यांवर छापे

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने शुक्रवारी रात्री उशिरापासून शनिवारी मध्यरात्रीपर्यंत शहरातील रेकॉर्डवरील दहा गुंडांच्या घरांसह छुप्या अड्ड्यांवर छापे टाकून झाडाझडती घेतली. कोम्बिंंग ऑपरेशन काळात ओपन बार व मद्यधुंद अवस्थेत वाहने चालविणार्‍या एकूण 8 तळीरामांची पथकाने थेट कोठडीत रवानगी केली.

शहर, उपनगरे, ग्रामीण भागातील खंडणीखोर, फाळकूट गुंडांसह संघटित टोळ्यांविरुद्ध कठोर कारवाईच्या सक्त सूचना पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी पोलिस ठाण्यांतर्गत प्रभारी अधिकार्‍यांना दिल्या आहेत. आदेशाचा काटेकोर अमल करण्याबाबत बजावण्यात आले आहे. आदेशाचे उल्लंघन करून समाजकंटकांना अभय देणार्‍यांविरुद्ध प्रसंगी कठोर कारवाईचाही त्यांनी इशारा दिला आहे.

या पार्श्वभूमीवर अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, शहर उपअधीक्षक अजित टिके, शाहूपुरीचे निरीक्षक अजयकुमार सिंदकर, लक्ष्मीपुरीचे निरीक्षक अविनाश कवठेकर, राजारामपुरीचे निरीक्षक अनिल तनपुरे यांच्यासह जुना राजवाडा पोलिसांनी शहरातील मध्यवर्ती परिसरात नाकाबंदी केली. उपनगरामध्ये कोम्बिंंग ऑपरेशन करण्यात आले.

हॉटेल, लॉजसह वाहनांची तपासणी

पोलिस रेकॉर्डवरील 10 सराईत गुंडांच्या घरांसह छुप्या अड्ड्यांवर छापे टाकून झाडाझडती घेण्यात आली. याकाळात ओपन बारप्रकरणी पाचजणांना, मद्यप्राशन करून धोकादायक स्थितीत वाहन चालविणार्‍यांसह 8 तळीरामांना ताब्यात घेऊन त्याची कोठडीत रवानगी करण्यात आली. तडीपार झालेल्या गुंडांच्या घरांचीही तपासणी करण्यात आली. 28 चारचाकी व 49 दुचाकी अशा 77 वाहनांची तपासणी करण्यात आली. शहरातील 8 लॉज, 10 हॉटेलचीही तपासणी करण्यात आल्याचे अप्पर पोलिस अधीक्षक देसाई यांनी सांगितले.

जुगारअड्ड्यांवर कारवाईच्या सूचना

जिल्ह्यातील इचलकरंजीसह पेठवडगाव, जयसिंगपूर, शिरोळ, कुरूंदवाड, हातकणंगले, कागल, मुरगूड, आजरा, गडहिंग्लज, नेसरी, चंदगड परिसरातही कोम्बिंंग ऑपरेशनद्वारे फाळकूट गुंडांविरोधात कठोर पावले उचलण्याच्या सूचना पोलिस अधीक्षकांनी दिल्या आहेत. मटका, गुटखा, मावा विक्रीच्या स्टॉल्ससह तीनपानी जुगार अड्ड्यांविरुद्ध विशेष पथकाला कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT