Latest

सहकारी साखर कारखान्यांचे खासगीकरण होऊ देणार नाही : अमित शहा

backup backup

लोणी (जि.नगर), पुढारी वृत्तसेवा

सहकारी साखर कारखान्यांचे खासगीकरण करुन चळवळ संपुष्टात आणण्याचे काम केले जात आहे. पण ज्या प्रवरानगरमध्ये देशातील पहिल्या सहकारी कारखान्याची मुहूर्तमेढ रोवली गेली तो कारखाना आजही सहकार पद्धतीने चालतो.हे आनंद देणारे आहे. सहकार क्षेत्र वाढविण्यासाठी आम्हाला हा कारखाना प्रेरणास्त्रोत म्हणून काम करेल. प्रवरानगरची ही जमीन सहकार क्षेत्राची काशी आहे, असे सांगून सहकारी साखर कारखानदारीचे खासगीकरण होऊ देणार नाही, या शब्दांत केंद्रीय सहकारमंत्री अमित शहांनी ठणकावले.

प्रवरानगर येथे राज्यस्तरीय सहकार परिषद तथा शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. माजी मंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारातून ही परिषद झाली. त्यामध्ये देशाचे पहिले सहकारमंत्री शहा बोलत होते.

याप्रसंगी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, डॉ. भागवत कराड, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, साखर कारखाना संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावर, खासदार डॉ. सुजय विखे पाटील यावेळी उपस्थित होते.

यावेळी मंत्री शहा यांनी सहकार क्षेत्राला वाचविण्यासाठी नेमके काय करता येईल याचे नियोजन सांगितले. मी काही समिती वगैरे स्थापन करणार नाही. आजवर भरपूर समित्या नेमल्या गेल्या आणि त्यांचे अहवाल धूळ खात पडून राहिले. पण त्यावर काहीच झाले नाही. त्यामुळे सहकार चळवळ वाचविण्यासाठी आम्ही कोणत्याही समित्या स्थापन करत बसणार नाही.

मी स्वत: या क्षेत्रातील विद्वान मंडळींसोबत बसून सर्व प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. देशात 31 टक्के साखरेचे उत्पादन सहकारी साखर कारखाने करतात. देशात 20 टक्के दूध सहकाराच्या माध्यमातून विकले जाते. अनेक क्षेत्रात सहकाराच्या माध्यमातून मोठी उलाढाल होत आहे. लवकरच साखर कारखान्यांवरील संकट रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून दूर करणार असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.

जिल्हा बँकांमध्ये हजारो कोटींचा घोटाळा कुणी केला?

स्वातंत्र्यांच्या 75 वर्षांपर्यंत कुणाला सहकार मंत्रालय स्थापन करावे वाटले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने सहकार मंत्रालय स्थापन करण्यात आले. आज सहकार क्षेत्र अडचणीत आहे. मात्र, सहकारातील व्यक्तींनी आपल्यात असलेल्या दोषातून स्वत:ला मुक्त केले पाहिजे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा बँका आदर्श मानल्या जात होत्या. आज फक्त तीन बँका चांगल्या उरल्या आहेत. हजारो कोटींचे घोटाळे कुणी केले? रिझर्व्ह बँकेने केले का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

सहकारात घोटाळे कुणी केले?: देवेंद्र फडणवीस

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सहकारातील घोटाळ्यांवर बोट ठेवले. अनेक चांगले सहकारी साखर कारखाने बंद पाडून खासगी लोकांच्या घशात घालण्याचे काम राज्यात झाले, अशी टीका त्यांनी केली. अनेक लोकं सहकारी चळवळ धोक्यात आहे असे सांगतात. पण असे लोकच खासगी कारखाने काढून बसले आहेत. ते खासगी कारखान्यांचे मालक आहेत. सहकारी कारखाने खासगीत त्यांनी नेले. आणि आता तेच सांगत आहेत की सहकार चळवळ अडचणीत आहे.

सहकारी कारखान्यांना मदत करण्याऐवजी ते कारखाने खासगीमध्ये कवडीमोलाच्या भावाने विकत घ्यायचे आणि त्याच कारखान्यांच्या जमिनी कोट्यवधींना विकायच्या, किंवा गहाण टाकायच्या, आणि त्यातून पुन्हा कारखाने उभे करायचे, हे शेतकर्‍यांच्या कारखान्यांना खासगी लोकांच्या घशात टाकण्याचे षडयंत्र चाललेले आहे. हे कुठेतरी थांबले पाहिजे आणि सहकार जगला पाहिजे, असेही फडणवीस म्हणाले.

साखर कारखान्यांचे दिवस पालटले!

अमित शहा हे सहकार चळवळीतून तयार झालेले नेते आहेत. एमएसपी लावल्याने साखर कारखाने तरले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिगटाने इथेनॉलबाबतचे सर्व निर्णय घेतले. इथेनॉल निर्मितीमुळे कारखान्यांची स्थिती सुधारली. शिवाय, इथेनॉलच्या नव्या धोरणामुळे साखर कारखान्यांचे दिवस पालटले. कारखान्यांचा होणार तोटा इथेनॉलमुळे भरून निघेल. साखर कारखान्यांनी 2 पैसे दिले तर त्यांना अमित शाह यांनी इनकम टॅक्सच्या जाचातून सोडवले आणि 30 वर्षाचा प्रश्न मार्गी लागला, असेही फडणवीस यांनी सांगितले.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT