Latest

पुणे : ग्रामीण भागातील सीएनजी गॅस पंपचालक पुन्हा संपावर जाणार; वाढीव कमीशन मिळत नसल्याने निर्णय

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे ग्रामीण भागात गुजरातमधील टोरेंट गॅस कंपनी सीएनजीचा पुरवठा करते. परंतु विक्रेत्यांना शासनाने मंजूर केलेले वाढीव कमिशन कंपनी देण्यास टाळाटाळ करत आहे. त्यामुळे पंप चालकांनी सीएनजी गॅस खरेदी-विक्री 27 जानेवारीपासून  बेमुदत बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे. यासंदर्भातील पत्र जिल्हाधिकार्‍यांना पाठवले आहे. केंद्र शासनाने सीएनजी वितरकांसाठी वाढीव कमिशन जाहीर केले आहे. पुणे शहराला सीएनजी पुरवठा करणार्‍या महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने वाढीव कमिशन विक्रेत्यांना दिले.

मात्र, ग्रामीण भागात पुरवठा करणार्‍या टोरेंट कंपनी व्यवस्थापन देण्यास टाळाटाळ करत आहे. यासंदर्भात यापूर्वीही विक्रेत्यांनी संप पुकारला होता. त्यावेळी जिल्हाधिकार्‍यांनी विक्रेते आणि कंपनी व्यवस्थापनाची बैठक घेतली होती. त्यात कंपनीच्या वतीने कमीशन देण्यासाठी वेळ मागून घेण्यात आले. पुन्हा दुसर्‍यांदा वेळ वाढून देण्यात आली. मात्र, कमिशन दिले जात नाही, कधीपर्यंत देणार हे सांगितले जात नाही, त्यामुळे विक्रेत्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती पेट्रोल पंप चालक संघटनेचे अध्यक्ष ध्रुव रुपारेल यांनी दिली.

सन 2021 मध्ये सीएनजी डीलर्सना फेअर ट्रेड मार्जिन (कमिशन) जारी करण्यात आले. मात्र, पुणे ग्रामीण भागात गॅस पुरवठा करणार्‍या टोरेंट गॅस कंपनीला अनेकवेळा विनंती करूनही त्यांनी कमिशन दिले नाही. पुणे जिल्ह्यातील सीएनजी वितरकांचे आजपर्यंत जवळपास 8 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे कमिशन देऊ नये, यासंबंधी केंद्र शासनाकडून कोणतेही आदेश आलेले नाहीत, असे असताना टाळाटाळ केली जात आहे.  सध्या विक्रीवर मिळणारे कमिशन हे परवडणारे नाही. पुणे जिल्ह्यातील टोरेंट गॅस विक्रेत्यांनी 27 जानेवारीपासून टॉरेंट सीएनजीची अनिश्चित काळासाठी खरेदी आणि विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

SCROLL FOR NEXT