Latest

Ian Wilmut Passes Away : क्लोनिंगद्वारे पहिली मेंढी जन्माला घालणा-या ‘या’ प्रसिद्ध शास्त्रज्ञाचे निधन

रणजित गायकवाड

पुढारी वृत्तसंस्था : Ian Wilmut Passes Away : जगातील पहिली क्लोन सस्तन मेंढी (डॉली) तयार करणारे प्रसिद्ध ब्रिटीश भ्रूणशास्त्रज्ञ सर इयान विल्मुट यांचे निधन झाले आहे. 2018 मध्ये पार्किन्सन आजाराचे निदान झाल्यानंतर वयाच्या 79 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रोफेसर विल्मुट यांनी 5 जुलै 1996 रोजी जन्मलेल्या डॉलीची निर्मिती करण्यासाठी एडिनबर्ग विद्यापीठातील रोझलिन इन्स्टिट्यूटमधील शास्त्रज्ञांच्या टीमचे नेतृत्व केले. त्यांच्या कार्याने स्टेम सेल संशोधनाचा पाया घातला.

शास्त्रज्ञ इयान विल्मोट यांचा जन्म इंग्लंडमधील स्ट्रॅटफोर्ड-अपॉन-एव्हॉनजवळ झाला. भ्रूणविज्ञानाच्या क्षेत्रात प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी शेती विषयाचा अभ्यास केला. त्यासाठी त्यांनी नॉटिंगहॅम विद्यापीठात शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी भ्रूणशास्त्रीय संशोधनातही लक्षवेधी कार्य केले. त्यानंतर, 2005 मध्ये ते एडिनबर्ग विद्यापीठात दाखल झाले आणि 2012 मध्ये सेवानिवृत्त झाले. (Ian Wilmut Passes Away)

क्लोनिंगद्वारे जन्माला येणारी ही जगातील प्राण्यांची पहिली प्रजात

22 फेब्रुवारी 1997 ही तारीख इतिहासात एका मोठ्या घटनेसह नोंदली गेली. या दिवशी स्कॉटलंडमधील रॉस्लिन इन्स्टिट्यूटच्या संशोधकांच्या पथकाने एक मोठी घोषणा केली. सस्तन प्राण्यांच्या पेशीपासून 'क्लोन' तयार संशोधकांना यश आले आहे. त्यातून एका मेंढीचा जन्म झाला आहे अशी ती घोषणा होती. या घटनेला दशकातील सर्वात मोठी घटना म्हटले गेले. 'डॉली' नावाच्या 'क्लोन' मेंढीचा जन्म प्रत्यक्षात 5 जुलै 1996 रोजी झाला होता, मात्र सात महिन्यांनंतर फेब्रुवारीमध्ये याची घोषणा करण्यात आली होती. क्लोनिंगद्वारे जन्माला येणारी ही जगातील प्राण्यांची पहिली प्रजात होती.

संशोशकांनी संपवले डॉलीचे जीवन

डॉलीने तिच्या वयाच्या दुसऱ्या वर्षी तिच्या पहिल्या कोकराला जन्म दिला. त्याचे नाव बोनी ठेवण्यात आले. यानंतर डॉलीने एकदा जुळ्या आणि नंतर तिळ्यांना कोकरांला जन्म दिला. सप्टेंबर 2000 मध्ये डॉलीने तिच्या शेवटच्या कोकराला जन्म दिला. त्यादरम्यान डॉलीला फुफ्फुसाचा कर्करोग आणि संधिवात झाल्याचे निदान झाले होते. त्यामुळे डॉलीची प्रकृती खूपच खराब झाली. अखेर संशोधकांनी डॉलीला तिच्या त्रासदायक जीवनातून मुक्त करण्याचा निर्णय घेतला आणि 14 फेब्रुवारी 2003 रोजी डॉलीचे इच्छामृत्यूच्या माध्यमातून जीवन संपवण्यात आले. रोझलिन संस्थेने डॉलीचा मृतदेह स्कॉटलंडच्या राष्ट्रीय संग्रहालयाला दान केला. आजही या संग्रहालयात डॉलीला पाहता येते. (Ian Wilmut Passes Away)

क्लोनिंग म्हणजे काय? (Ian Wilmut Passes Away)

अमेरिकेच्या नॅशनल ह्युमन जीनोम रिसर्च इन्स्टिट्यूट (NHGRI) च्या मते, क्लोनिंगमध्ये अनेक पद्धती, अनेक दृष्टीकोन असू शकतात, परंतु शेवटी कोणत्याही जीवाची एक समान प्रत तयार करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. म्हणजे, जर मानवी क्लोन बनवता आला, तर तुम्हाला एकसारखे दिसणारे दोन किंवा अनेक व्यक्ती भेटू शकतात. मात्र जरी ते जवळजवळ एकसारखे दिसत असले तरी, क्लोन आणि मूळ एकसारखे नसतील. त्यांच्यात काही फरक असेल. त्यांच्या बोटांचे ठसे आणि डोळ्यांमध्येही फरक असेल.

SCROLL FOR NEXT