Latest

हवामान बदलाने वाढवला शेतकरी आत्महत्यांचा धोका

Arun Patil

कोल्हापूर : महेश भागवत थोरात या तरुण शेतकर्‍याने बीड जिल्ह्यातील कुंभपेण गावात नुकतीच आत्महत्या केली. महेश याने सोयाबीन लागवडीसाठी एक लाख रुपये कर्ज घेतले होते; पण जून महिन्यातील कमी पाऊस आणि त्यानंतर पिकांवर पडलेली कीड यामुळे त्यांचे पीक हातचे गेले. घेतलेले कर्ज भागवायचे कसे, या विवंचनेतून त्याने टोकाचे पाऊल उचलले.

महेशने घरी दोर आणून ठेवला होता, तो का त्याने घरी आणला होता हे आम्हाला कळाले नाही, अशी प्रतिक्रिया महेशचे वडील भागवत यांनी दिली. महेशच्या मृत्यूनंतर एक-दोन दिवसातच त्यांनी घरातील गुरे विकून टाकली.

पण, शेतकरी आत्महत्यांची मराठवाड्यातील ही एकमेव घटना नाही. मान्सूनने ओढ दिलेल्या जून महिन्यात मराठवाड्यात फक्त 55.5 मिमी इतका पाऊस झाला होता. मराठवाड्याच्या सरासरीपेक्षा हा पाऊस 41.41 टक्के इतका होता. या एका महिन्यात मराठवाड्यातील 92 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या; तर जुलै महिन्यातील पहिले दोन आठवडे पावसाने ओढ दिली होती. या महिन्यात मराठवाड्यात 101 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या; तर 1 जानेवारी 2021 ते जून 2023 या अडीच वर्षांच्या कालावधीत मराठवाड्यात एकूण 2,392 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. यंदा पावसाने ओढ दिलेली असल्याने, राज्यातील बर्‍याच भागात दुष्काळीस्थिती निर्माण झालेली आहे. या परिस्थितीत शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी आगाऊ स्वरूपाच्या उपाययोजना केल्या जाव्यात, अशी भूमिका तज्ज्ञ मांडत आहेत.

लहान शेतकर्‍यांच्या आत्महत्या जास्त

2014 ला नॅशनल क्राईम रेकॉर्डस् ब्युरोने शेतकरी आत्महत्यांचा स्वतंत्र उल्लेख केला होता. देशातील एकूण आत्महत्यांमध्ये अल्पभूधारक (27.9 टक्के) आणि लहान भूधारक (44.5टक्के) शेतकर्‍यांची संख्या सर्वांत जास्त असल्याचे म्हटले होते. यामध्ये कर्जबाजारीपणा, नापिकी, कौटुंबिक कारणे, आजारपण आणि व्यसनाधिनता आत्महत्यांची प्रमुख कारणे असल्याचे म्हटले होते.

SCROLL FOR NEXT