Latest

‘ड्रग्ज फ्री नाशिक’ करण्यासाठी शहरातील गुदामे पुन्हा रडारवर

अंजली राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
पुणे (Pune) येथून नुकतेच कोट्यवधी रुपयांचे एमडी (Mephedrone) जप्त केल्यानंतर शहर पोलिस (City Police) पुन्हा सतर्क झाले आहेत. शहरातील सर्व गोदामे, कारखाने, संशयास्पद ठिकाणांची तपासणी करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. त्यामुळे अनधिकृत व अवैध व्यवसाय पुन्हा पोलिसांच्या रडारवर आले आहेत. तसेच सर्व पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील पानटपऱ्यांचीही यादी करण्याचे आदेश पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिले आहेत.

२०२३ मध्ये वर्षअखेरीस शहर पोलिसांनी एमडी (Mephedrone) विक्रेते, साठे करणारे व बनवणाऱ्या टोळींचा छडा लावला होता. नाशिकच्या शिंदे गावात (Nashik) एमडीचे कारखाने उद्ध्वस्त करीत गोदामे शोधली. तसेच सोलापूर येथील दोन कारखाने शोधून एमडी विक्रेत्यांना दणका दिला. या कारवाईंमधून संशयित छोटी भाभी, सनी पगारे, अर्जुन पिवाल, ललित पानपाटील, त्याचा भाऊ भूषण व मित्र अभिषेक बलकवडे यांच्या टोळ्या उघड झाल्या. त्यातील बहुतांश गुन्हेगार कारागृहात आहेत. तरीदेखील शहरात एमडी (एमडी- Mephedrone) विक्री होत असल्याचे पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यांवरून उघड झाले आहे. नुकत्याच केलेल्या कारवाईंमधून संशयितांनी मुंबईकडून एमडी आणल्याचा दावा केल्याने पोलिस सतर्क झाले आहेत. शहर 'ड्रग्ज फ्री' (Drug Free Nashik) करण्यासाठी व एमडीचे पाळेमुळे नष्ट करण्यासाठी स्थानिक पोलिस ठाणे व गुन्हे शाखेच्या पथकांना ड्रग्जचे कारखाने, गोदामे शोधण्याचे आदेश कर्णिक यांनी दिले आहेत. त्यानुसार शहर पोलिसांनी (City Police) शोधमोहीम सुरू केली आहे.

दुर्लक्षित ठिकाणे तपासणार
शहरातील बंद कारखाने, गोदामे व इतर संशयास्पद ठिकाणी पोलिस तपासणी करीत आहेत. तसेच केमिकल, ॲग्रो कंपन्यांचीही चौकशी होणार असून, औद्योगिक वसाहतीतील गाळे, भूखंड तपासले जातील. एमडी विक्रेत्यांवर कारवाई केली जात असून, पोलिस ठाणेनिहाय पानटपऱ्यांची यादी तयार केली असून, पानटपऱ्यांचीही अचानक तपासणी केली जाणार आहे. शैक्षणिक संस्था परिसरातही पोलिसांची साध्या वेशात गस्त राहणार आहे.

शहरातील गोदामे, कंपन्या, संशयास्पद ठिकाणांसह पानटपऱ्यांची तपासणी करीत आहोत. पानटपऱ्यांमध्ये अमली पदार्थ विक्री होत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यानुसार कारवाई सुरू आहे. – डॉ. सीताराम कोल्हे, सहायक पोलिस.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT