आता हा आठवडा सर्वत्र व्हॅलेंटाईन सप्ताह म्हणून साजरा केला जातोय, तुझे काय प्लॅन्स आहेत रोज डे चे? केलास का साजरा?
अरे कशाचा रोज डे? गुलाबाचे फुल घेऊन घरी गेलो आणि थाटात गुडघ्यावर बसून बायकोला फूल दिले आणि म्हणालो, 'हॅप्पी रोज डे!' ती ओरडली, पुरे करा हे नाटक! शोभतं का तुम्हाला या वयात? आणि गेल्या वीस वर्षात कधी बेशरमाचे फूल दिले नाहीत आणि आता गुलाबाचे फूल देत आहात. म्हणजे रोज डे वाया गेला म्हणायचा की काय?
हो, निश्चितच! दुसर्या दिवशी आला प्रपोज डे. प्रपोज डे म्हणजे प्रस्ताव ठेवायचा की तू माझ्याशी लग्न करशील का किंवा माझ्या प्रेमाला स्वीकारशील का? आता मला सांग लग्नाला वीस वर्षे झाली अशा लोकांनी अशा दिवशी काय करायचं माहीत नाही? तुला माहीत असेल तर सांग.
एवढं काही अवघड नाही रे! पुन्हा एकदा स्टाईल के साथ प्रपोज करायचं त्याच बायकोला. नाही तरी तुझे पुढच्या सातही जन्माचे बुकिंग करून ठेवलेलेच आहे त्यांनी. त्यात आणखी एक वर्ष, आहे काय आणि नाही काय!
यार मला सांग, कुणी काढलं असेल हे, जे आपल्या संस्कृतीत कधी नव्हतं? नंतर येतो चॉकलेट डे आणि नंतर याचा कळस म्हणजे व्हॅलेंटाईन डे!
काढलं कोणी हे माहीत नाही; पण बहुतेक ग्रीटिंग कार्ड तयार करणारे, फुलं विकणारे, चॉकलेटचे उत्पादक यांनी हे काढलं असावं.
संत व्हॅलेंटाईन यांनी काय प्रेम प्रकरणातल्या लोकांनी फक्त एकमेकांना प्रेम संदेश द्यावा असे सांगितलेले आहे की काय ?
नाही रे, त्यांनी मानव जातीवर प्रेम करा असा संदेश दिला आहे. लोकांनी तो आपापल्या सोयीने घेतला. ज्याचे जिच्यावर किंवा जिचे ज्याच्यावर प्रेम आहे त्यांना आपले प्रेम खुलेपणाने व्यक्त करण्याचा परवानाच जणू मिळाला. मग, हळूहळू हे लोक रस्त्यावर लागले धुडगूस घालू लागले, मोठ्या मोठ्या पार्ट्या अरेंज केल्या जाऊ लागल्या. पब आणि बार्स भरून वाहायला लागले. प्रेमाचा महापूर आपल्या राज्यात, देशात आणि जगभर सर्वत्र इकडून तिकडे आणि तिकडून इकडे वाहायला लागला. खूप लोकांचा भरपूर व्यवसाय झाला. हॉटेल्स, ग्रीटिंग कार्डवाले, गिफ्ट सेंटरवाले यांची चांदी झाली. म्हणजे वर्षभरात तरुण-तरुणींना बिनदिक्कतपणे 'आय लव यू' म्हणायची खुलेआम परवानगी मिळाली. बरं, मला एक सांग, समोरच्या व्यक्तीला तुझे प्रेम मान्य नाही तर मग काय करणार? काही नाही. 'आय लव यू' ला, 'आय डोन्ट' एवढेच उत्तर द्यायचे विषय संपला. मला असे वाटते की, यानंतर या व्यापारीकरणामुळे नवनवीन डेज येतील. साडूज डे, चुलत ब्रदर्स डे, मावस बहीण डे, मेहुणा डे, मेहुणी वीक असे पण येतील.
थोडक्यात, म्हणजे काही ना काहीतरी निमित्त काढ आणि काही ना काही तरी वस्तू ग्राहकाला विक एवढेच तत्त्व असावे. अगदी पोळा सणाच्या आधी भविष्यकाळात 'पोळा वीक'पण येऊ शकतो. म्हणजे पोळ्याच्या आधी सात दिवस गायी-बैलांसाठी बाथ डे, मेकअप डे, झुल डे, घुंगूरमाळा डे, नो वर्क डे, नो मिल्क डे असे विविध प्रकार काढून पोळासुद्धा आठवडाभर साजरा केला जाईल, काय माहिती?
एक मात्र खरे, व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने प्रेमीयुगुल आयुष्यभर एकत्र राहण्याचा आणाभाका घेतात. प्रेम ही अशी भावना आहे की, त्याला जगात तोड नाही. पवित्र बंधन असते. यात जोडीदारांनी एकमेकांना आयुष्यभर एकत्र राहण्याचे वचन दिले जाते. खरेच, या प्रेमाचे पावित्र्य राखल्यास प्रेमाला किती महत्त्व प्राप्त होईल. आजकालच्या जगात खर्या प्रेमाची वाणवा आहे; पण प्रेम ही देवाची देणगी आहे. आपल्या जोडीदाराच्या सुखाची आणि त्याला कायम आंनदात राखण्याची ही एक पवित्र भावना आहे. प्रेमाचे पावित्र्य राखल्यास खर्या अर्थाने 'व्हॅलेंटाईन डे' साजरा होईल, हे नक्की!
– झटका