माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात एक नवी सावकारशाही कार्यरत झाल्याचे समोर आले असून, तिचे स्वरूप महाभयंकर आहे. अलीकडील काळात बनावट चिनी अॅप्सद्वारे देशातील असंख्य जणांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक, छळवणूक केल्याच्या घटना नोंदवल्या गेल्या आहेत. विशेष म्हणजे यातील अनेकांनी या कर्जामुळे होणार्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचे प्रकार समोर आले आहेत. याला लगाम घालण्यासाठी तत्काळ पावले उचलणे गरजेचे आहे.
इंटरनेट क्रांतीमुळे माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राचा झपाट्याने विस्तार होत असतानाच, दुसरीकडे वाढत्या सायबर गुन्हेगारीनेही मोठे आव्हान उभे केले आहे. यातील चिंतेची बाब म्हणजे इंटरनेटला भौगोलिक सीमांचे बंधन नसल्यामुळे, जगाच्या कोणत्याही एका कोपर्यातील गुन्हेगारी प्रवृत्तीची व्यक्ती दुसर्या कोपर्यातील व्यक्ती, संस्था अथवा व्यक्तिसमूहांना सहजगत्या आपल्या जाळ्यात ओढण्यात यशस्वी होऊ शकते. विविध प्रकारच्या घातक आणि बनावट वेबसाईट्स असोत किंवा स्मार्टफोनच्या विश्वात दाखल होणारी विविध प्रकारची अॅप्स हे यासाठीचे 'प्रभावी' माध्यम ठरताना दिसताहेत. सध्या देशभरात बनावट चिनी अॅप्सद्वारे होणार्या कर्जपुरवठ्याचे प्रकरण गाजत आहे. केंद्रीय अर्थमंत्री आणि रिझर्व्ह बँकेनेही याप्रकरणी गांभीर्याने विचारविनिमय सुरू केला आहे.
चिनी अॅप्सच्या विळख्यात अडकलेल्यांनी आत्महत्या केल्याची प्रकरणे समोर आल्यानंतर, याकडे तपास यंत्रणांचे लक्ष वेधले गेले. त्याची काही उदाहरणे पाहूया.
'मलाही जगण्याची इच्छा आहे; परंतु माझी परिस्थिती तशी राहिली नाही. यार, मी वाईट नाही. यात कुणाचाही दोष नाही. माझाच दोष आहे. मी अनेक ऑनलाईन अॅप्सवरून कर्ज घेतले आहे. उदा. ट्रू बॅलन्स, मोबी पॉकेट, मनी व्ह्यू, स्मार्ट कॉइन, रुफिलो इत्यादी. परंतु कर्ज फेडण्यास मी सक्षम नाही. इज्जतीच्या भीतीने मी हे पाऊल उचलत आहे…' इंदूरच्या अमित यादवने 22 ऑगस्ट रोजी ही सुसाईड नोट लिहिली होती. अमितने आधी त्याची पत्नी टीना आणि दोन मुलांची हत्या केली आणि नंतर आत्महत्या केली. इंदूरमध्ये यावर्षी एप्रिलमध्येही अशाच प्रकारे आत्महत्येचे प्रकरण समोर आले होते.
हैदराबादच्या जियागुडा येथे राहणार्या कमलम्मा यांच्यासाठी 17 एप्रिलचा दिवस हे एक दुःस्वप्न होते. सकाळी आठ वाजता रोजंदारी उरकून घरी परतल्यावर, मुलगा राजकुमार हा नेहमीप्रमाणे दरवाजा ठोठावल्यावर दार उघडेल, अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र, तसे झाले नाही. दरवाजा तोडला असता, आत राजकुमारचा मृतदेह पंख्याला लटकलेला दिसला. राजकुमारने एवढे टोकाचे पाऊल का उचलले? हे कमलम्माला समजले नाही. पोलिसांनी राजकुमारच्या फोनचा तपास केला असता, त्याच्या व्हॉट्स अॅपवर वेगवेगळ्या क्रमांकांवरून धमकीचे मेसेज आल्याचे दिसून आले. फोनमध्ये एकूण 11 विविध अॅप्स सापडली. त्यातून हार्मनी लोन आणि हसी लोन या अॅप्सकडून राजकुमारला सतत धमकीचे मेसेज पाठवले जात होते. असेच धमकीचे काही मेसेज राजकुमारच्या मित्रांना आणि सहकार्यांनाही आले होते. कलेक्शन एजंट राजकुमारच्या मित्रांना राजकुमारवर कर्जाच्या परतफेडीसाठी दबाव आणण्यास सांगत होते.
एकट्या हैदराबादमध्ये लोन अॅपकडून होत असलेल्या ब्लॅकमेलमुळे 2020 च्या सुरुवातीपासून आतापर्यंत 9 जणांनी आत्महत्या केली आहे. कर्जाच्या वसुलीच्या नावाखाली होत असलेल्या ब्लॅकमेलच्या विरोधात काम करणार्या 'सेव्ह देम इंडिया फाऊंडेशन' या स्वयंसेवी संघटनेच्या वतीने एकत्रित करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, लोन अॅप कंपन्यांकडून केल्या जात असलेल्या ब्लॅकमेलमुळे देशभरात 52 जणांनी आत्महत्या केली आहे.
हैदराबाद पोलिसांकडे लोन अॅपकडून होत असलेल्या ब्लॅकमेलच्या विरोधात पहिली तक्रार सुमारे दोन वर्षांपूर्वी आली. नोव्हेंबर 2020 च्या अखेरच्या सप्ताहात एक महिला आपली तक्रार घेऊन हैदराबाद पोलिसांच्या सायबर सेलकडे गेल्या. त्यांची तक्रार अशी होती की, त्यांनी इन्स्टंट लोन अॅपच्या माध्यमातून पाच हजारांचे कर्ज घेतले होते. कर्ज परत करण्याची अंतिम तारीख 21 नोव्हेंबर 2020 होती. परंतु, त्यांना परतफेड करण्यास अवघ्या एका दिवसाचा विलंब झाला. पैसे भरल्यानंतरही त्यांना फोन कॉल यायला सुरुवात झाली. त्यांना फोटोशॉपवर एडिट केलेले त्यांचे विवस्त्र फोटो पाठविले जाऊ लागले. '60,000 रुपये द्या अन्यथा हे फोटो व्हायरल करू,' अशा शब्दांत त्यांना ब्लॅकमेल केले जाऊ लागले. पोलिसांनी या तक्रारीवरून साधी सायबर फ्रॉडची तक्रार नोंदवून घेतली.
परंतु, काही दिवसांतच अशा प्रकारच्या अनेक तक्रारी पोलिसांकडे येऊ लागल्या. सुरुवातीला हा अगदी नवीन प्रकार होता. त्याच दरम्यान पोलिसांना अशी माहिती मिळाली की, कर्ज घेणार्यांना जे फोन कॉल येत होते, त्यांचे लोकेशन गुरुग्राम होते. तपासादरम्यान हा व्यवसाय किती फोफावला आहे आणि त्याची पाळेमुळे किती खोल गेली आहेत, हे पोलिसांना प्रथमच दिसून आले. तेथील कॉल सेंटर्समधून सुमारे 12 लोन अॅप चालवले जात होते. या कॉल सेंटरमध्ये 700 च्या आसपास कर्मचारी कार्यरत होते. या कर्मचार्यांचे काम प्रारंभी नवनवीन ग्राहकांना कर्जाच्या जाळ्यात ओढणे आणि नंतर त्यांना धमकीचे कॉल करणे, तसेच मेसेज पाठविणे हे होते. हे एक मोठे गुन्हेगारी नेटवर्क असल्याचे स्पष्ट झाले.
26 सप्टेंबर 2020 रोजी हैदराबाद पोलिसांच्या सायबर सेलने बंगळूर येथील दोन कॉल सेंटरवर छापा टाकला. तेथून तब्बल 42 लोन अॅप्सचे संचालन सुरू असल्याचे स्पष्ट झाले. लियुफंग टेक्नॉलॉजीज, पिन प्रिंट टेक्नॉलॉजीज, हॉटफुल टेक्नॉलॉजीज आणि नॅबलूम टेक्नॉलॉजी; या चार कंपन्या ही सर्व अॅप्स चालवीत होत्या. विशेष म्हणजे उर्वरित तीन कंपन्या या लियुफंग टेक्नॉलॉजीज या कंपनीच्या सहकारी कंपन्या म्हणून कार्यरत होत्या. या कंपनीची सीईओ क्युई युआन नावाची महिला होती. कंपनीत तिला जेनिफर किंवा सीसी नावाने ओळखले जात असे. स्थानिक पातळीवर पैशांच्या कलेक्शनची जबाबदारी झू वेई उर्फ लॅबो नावाच्या चिनी इसमाकडेच होती.
एंजिला नावाच्या आणखी एका कंपनीचा तांत्रिक कारभार एंजिला नावाची चिनी महिलाच सांभाळत असल्याचे दिसून आले. पैसे ट्रान्स्फर करण्यासाठी या कंपन्यांनी व्हर्च्युअल पेमेंट गेटवेवर 350 पेक्षा अधिक व्हर्च्युअल अकाऊंट तयार केली असल्याचे पोलिसांना आढळून आले. या गेटवेच्या माध्यमातून पीडितांकडून पैशांची वसुली केली जात होती. या सर्व इन्स्टंट लोन अॅपमधील खास बाब अशी की, जो कोणी हे अॅप डाऊनलोड करेल, त्याच्या मोबाईलमधील सर्व डेटा क्लाऊडमध्ये स्टोअर होत असे. केवासयीच्या नावाखाली पीडिताकडून आधार कार्ड, पॅन कार्ड आणि फोटोसह ओळख सांगणारे सर्व दस्तऐवज मागविले जात असत. हे दस्तऐवज पुढे पेमेंट गेटवेकडे नकली अकाऊंट उघडण्यासाठी पाठविले जात असत.
व्हर्च्युअल कॉलसाठी आयडी तयार केला जात असे. एसटीआय आणि ऐनक्स यांसारख्या अॅप्सचा वापर पीडितांना कॉल करण्यासाठी केला जात असे. व्हर्च्युअल नंबरवरून या अॅपच्या साहाय्याने धमकीचे मेसेज पाठविले जात असत. या क्रमांकांवर जर कोणी कॉल बॅक केलाच, तरी तो लागत नाही. इंटरनेट कनेक्शनचा आयपी अॅड्रेस शोधण्याचा जरी कुणी प्रयत्न केला, तरी दुसर्या देशांचे आयपी अॅड्रेस दिसून येतात. अशा प्रकारे पूर्ण प्लॅनिंग करून प्रदीर्घकाळ हे टोळके पोलिसांची कारवाई टाळत राहिले. परंतु, अखेर ते जाळ्यात आलेच.
चिनी अॅप्सच्या मदतीने हा जो खेळ चालला आहे, त्यामुळे आणि कॉल सेंटरवर चिनी व्यक्तींना अटक झाल्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. कोव्हिड महामारीच्या काळात अनेकांनी या झटपट कर्ज अॅपद्वारे कर्ज घेतले होते. हे अॅप चीनमधील कंपन्यांद्वारे चालवले जात होते. याद्वारे दिले जाणारे कर्ज अत्यंत महागड्या व्याजदरात उपलब्ध होते. तसेच फोनमध्ये अॅप डाऊनलोड होताच, फोनची सर्व माहिती कंपन्यांपर्यंत पोहोचायची.
या वैयक्तिक माहितीचा वापर कर्जदारांना धमकावण्यासाठी आणि त्यांच्याकडून अवास्तव व्याज आकारण्यासाठी केला गेला. यामुळेच अनेकांनी या अॅप्सच्या माध्यमातून कर्ज घेऊन आत्महत्या केल्या होत्या. अलीकडेच 'ईडी'ने यासंदर्भात मोठी छापेमारी केली आहे. 'ईडी'च्या म्हणण्यानुसार, या कंपन्यांकडे असलेल्या भारतीय नागरिकांच्या कागदपत्रांचा वापर त्यांना बनावट संचालक बनवण्यासाठी केला जातो. या कंपन्या चीनमध्ये बसलेले लोक चालवत आहेत.
तपासणीच्या फेर्यात असलेल्या या कंपन्या पेमेंट सर्व्हिस कंपन्या आणि बँकांशी जोडलेल्या मर्चंट आयडी किंवा खाते वापरून गुन्ह्यातून पैसे गोळा करत होत्या. या कंपन्यांनी दिलेले पत्तेही बनावट आहेत. चौकशी सुरू झाल्यानंतर यापैकी बर्याच कंपन्यांनी व्यवसाय बंद केला होता. त्यानंतर क्रिप्टोकरन्सी मालमत्ता खरेदी करण्यासाठी फिनटेक कंपन्यांमार्फत मोठ्या प्रमाणात निधी वळवला. हाच निधी नंतर परदेशात वळवला गेला, असा आरोप 'ईडी'ने केला आहे. 'ईडी'ने अलीकडेच लोकप्रिय क्रिप्टोकरन्सी एक्स्चेंज वझीर एक्सशी जोडलेल्या जागेचा शोध घेऊन, या संबंधात त्याच्या खात्यातील 64 कोटी रुपये गोठवले. दोन वर्षांपूर्वी 'ईडी'ने बेकायदेशीरपणे भारतात बेटिंग आणि कर्ज अॅप्स चालवणार्या एका चिनी कंपनीचे सुमारे 47 कोटी रुपये गोठवले होते.
एकंदरीतच, चिनी लोन अॅप्सचा हा विळखा महाभयंकर असून देशातील असंख्य जण यामध्ये फसले असण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक अडचणींमुळे अडल्या-नडलेल्यांची झालेली अगतिकता हेरून त्यांना आपल्या जाळ्यात ओढणार्या या सायबर गुन्हेगारांना कडक शासन होण्याची आवश्यकता आहे. वास्तविक, कोणतेही इन्स्टंट कर्जांचे मोबाइल अॅप कितीही आकर्षक ऑफर देत असेल, तरी अशा अॅपची लिंक चुकूनही टच होऊ देऊ नका, अशी सूचना पोलिसांकडून वारंवार केली जाते. परंतु, गरजवंताला अक्कल नसते, या न्यायाने असंख्य लोक या अॅप आधारित इन्स्टंट कर्ज देणार्या कंपन्यांच्या जाळ्यात ओढले जातात. परंतु, एवढी मोठी टोळी पकडली गेल्यानंतर तरी सावध व्हायला हवे. विशेषतः महिलांनी या वाटेला न गेलेलेच बरे. कारण संबंधित कंपन्या त्यांच्या फोटोंचा दुरुपयोग करून त्यांना ब्लॅकमेल करतात, असे दिसून आले आहे. तुमच्या मोबाईलमधील डेटा हा तुमचा व्यक्तिगत डेटा असून, तो तुम्हीच सांभाळायचा आहे. एखादे अॅप डाऊनलोड करताच तुमचा सर्व डेटा एखाद्या गुन्हेगारी टोळक्याच्या हाती लागत असेल, तर सावध व्हायलाच हवे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे कर्जाचे हप्ते न भरल्याच्या कारणावरून जर कोणी आपल्याला ब्लॅकमेलिंग करत असेल, अश्लील फोटो तयार करून पाठवत असेल, तर तो कायदेशीर गुन्हा आहे. माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 च्या कलम 66 ई नुसार हेतुपूर्वक किंवा जाणूनबुजून कोणत्याही व्यक्तीच्या, तिच्या किंवा त्याच्या परवानगीशिवाय, खासगी क्षेत्राची प्रतिमा काढून, ती प्रकाशित किंवा संविहित करणे हे त्या व्यक्तीच्या खासगीपणाचे उल्लंघन मानले गेले आहे. कलम 67 नुसार, इलेक्ट्रॉनिक स्वरूपात असे अश्लील साहित्य प्रकाशित किंवा संविहित करण्याबद्दल शिक्षेची तरतूद आहे.
कलम 67 अ नुसार इलेक्ट्रॉनिक स्वरूपात प्रच्छन्न लैंगिक कृती असलेले अश्लील साहित्य प्रकाशित किंवा संविहित करण्याबद्दल शिक्षेची तरतूद आहे. परंतु, आपल्याकडे एकंदरीतच कायद्यांबाबतचे अज्ञान असल्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचे फावते. मुळातच कर्ज भरू न शकल्याने अपराधीपणाची भावना कर्जदारांच्या मनात असते. त्यामुळे ते अशा ठगांविरोधात कायदेशीर कारवाईचा विचारही करत नाहीत म्हणूनच आयटी कायद्याबाबत लोकांचे प्रबोधन करण्याचीही नितांत गरज यानिमित्ताने प्रकर्षाने समोर आली आहे.
महेश कोळी, सायबरतज्ज्ञ