पुढारी ऑनलाईन डेस्क : China Stapled Visas : भारतीय वुशू संघातील तीन अरुणाचल प्रदेशच्या खेळाडूंना चीनने स्टेपल व्हिसा जारी केल्याने दोन्ही देशांतील संबंध पुन्हा ताणले गेले आहेत. चीनच्या अशा कारवाया अजिबात खपवून घेणार नाही, असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
चीनच्या या कारवाईवर कठोर भूमिका घेत भारत सरकारने वुशू संघातील सर्व खेळाडूंना विमानतळावरून परत बोलावले आहे. वृत्तानुसार, 11 सदस्यीय भारतीय संघ चीनमध्ये होणाऱ्या वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्समध्ये सहभागी होण्यासाठी 26 जुलैच्या रात्री उशिरा रवाना होणार होता. (India vs China)
वास्तविक, स्टेपल व्हिसा हा सामान्य व्हिसापेक्षा वेगळा असतो. चीन अनेकदा वादग्रस्त प्रदेशांचे नागरिक मानणाऱ्या लोकांना स्टेपल व्हिसा जारी करतो. चीन अनेक दिवसांपासून अरुणाचल प्रदेशावर आपला हिस्सा असल्याचा दावा करत आहे. तर भारताने चीनच्या या दाव्याला विरोध केला आहे. (India vs China)
जेव्हा एखाद्या व्यक्तीला दुसऱ्या देशात जायचे असते तेव्हा त्याला त्या देशाची परवानगी घ्यावी लागते, ज्याला व्हिसा म्हणतात. पर्यटक व्हिसा, बिझनेस व्हिसा, ट्रान्झिट व्हिसा, पत्रकार व्हिसा, एंट्री व्हिसा, ऑन अरायव्हल व्हिसा आणि पार्टनर व्हिसा असे विविध प्रकारचे व्हिसाचे पर्याय आहेत. चीनने या खेळाडूंसाठी स्टेपल व्हिसा जारी केला होता. या प्रकारच्या व्हिसामध्ये इमिग्रेशन अधिकारी पासपोर्टवर शिक्का मारत नाही, तर पासपोर्टला वेगळा कागद किंवा स्लिप जोडतो. स्टॅम्प सहसा ती व्यक्ती कोणत्या उद्देशाने त्या देशाला भेट देत आहे हे सूचित करते. स्टेपल व्हिसामध्ये, प्रवासाचा उद्देश व्यक्तीच्या पासपोर्टसह वेगळ्या शीटवर लिहिला जातो. इमिग्रेशन अधिकारी त्या कागदावर शिक्का मारतो. याला स्टेपल व्हिसा म्हणतात.
सामान्य व्हिसामध्ये असे होत नाही. स्टेपल व्हिसाधारक परतल्यावर, व्हिसासह स्टेपल केलेला स्टॅम्प फाडला जातो. म्हणजेच या प्रवासाचा कोणताही तपशील व्यक्तीच्या पासपोर्टवर नोंदवला जात नाही. दुसरीकडे सामान्य व्हिसावर प्रवासाचा तपशील नोंदवला जातो. चीनच्या भेदभावपूर्ण कारवाईला प्रत्युत्तर म्हणून भारत सरकारने तत्काळ कारवाई करत कोणत्याही भारतीय वुशू खेळाडूने चीनला स्पर्धेसाठी प्रवास करू नये, असे सांगितले.
कोणताही देश त्याच्या नागरिकत्वाच्या सद्यस्थितीवर आपला निषेध नोंदवण्यासाठी स्टेपल्ड व्हिसा जारी करतो. अरुणाचल प्रदेशातील तीन खेळाडूंना स्टेपल्ड व्हिसा देऊन आम्ही अरुणाचल प्रदेश हा वादग्रस्त प्रदेश मानतो असं चीनला दाखवून द्यायचं आहे. भारताची चीनसोबत 3488 किलोमीटर लांबीची सीमा आहे. परंतु संपूर्ण सीमांकन झालेलं नसल्याने भारत आणि चीनमध्ये अनेक भागावरुन मतभेद आहेत. भारताचा हजारो किलोमीटरचा भूभाग आपला असल्याच दावा चीन करतो. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, अरुणाचल प्रदेशातील सुमारे 90 हजार चौरस किलोमीटर भूभागावर चीनने दावा केला आहे.
अनेक देशांद्वारे स्टेपल्ड व्हिसा जारी केला जातो. या देशांमध्ये क्युबा, इराण, सीरिया आणि उत्तर कोरिया यांचा समावेश आहे. यापूर्वी चीन आणि व्हिएतनामने आपल्या नागरिकांना स्टेपल व्हिसा दिला होता, परंतु या देशांमधील करारानंतर त्यांना व्हिसा सूट मिळाली आहे. अरुणाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीर या दोन भारतीय राज्यांतील नागरिकांना चीन स्टेपल व्हिसा जारी करतो.
वुशू हा चिनी मार्शल आर्ट्स खेळाचा एक प्रकार आहे. चीनमध्ये दर दोन वर्षांनी घेतल्या जाणाऱ्या 'फिसू जागतिक विद्यापीठ खेळ' (FISU World University Games) या स्पर्धेतील 11 विविध खेळांमध्ये सहभागी होण्यासाठी 227 खेळाडू चीनमध्ये गेले आहेत. चेंगडू येथे होत असलेली स्पर्धा 2021 मध्येच होणे अपेक्षित होते; मात्र करोना महामारीमुळे ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली. तसेच मूळ 2023 ची ही स्पर्धा चीनच्या 'येकातेरिनबर्ग' प्रांतात भरविण्याचे ठरले होते; मात्र फेब्रवुारी 2022 मध्ये रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर ही स्पर्धा रद्द करण्यात आली होती.
दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी चीनच्या स्टेपल व्हिसा प्रकरणी प्रतिक्रिया दिली. त्यांनी ट्विट करत तिबेटचे नागरिक जे भारताला भेट देतात त्यांना भारत सरकारने स्टेपल व्हिसा जारी करावा. जोपर्यंत तिबेट आणि भारत यांच्यातील वादग्रस्त सीमारेषेवर तोडगा निघत नाही तोपर्यंत तिबेटी नागरिकांही स्टेपल व्हिसा जारी करण्यात यावा असे आवाहन केले आहे.