Latest

China-India dispute : भारताच्या सीमेवर चीनची बॉम्बर विमाने!

Arun Patil

बीजिंग ; वृत्तसंस्था : चीनने भारताला पुन्हा एकदा धमकावण्याचा प्रयत्न केला आहे. (China-India dispute) भारताला लागून असलेल्या सीमेवर चिनी लष्कराने 'बॉम्बर प्लेन' तैनात केले आहेत. ही विमाने 'सीजी-20' या दीर्घ पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांनी सज्ज असून, भारताची राजधानी दिल्ली या क्षेपणास्त्रांच्या टप्प्यात आहे. भारताचे अनेक हवाईतळही पल्ल्यात आहेत.

गेल्या आठवड्यात 11 नोव्हेंबर रोजी पीपल्स लिबरेशन आर्मीच्या हवाईदलाने 72 व्या वर्धापन दिनानिमित्त 'चायना सेंट्रल टेलिव्हिजन'ने हिमालयालगत उड्डाणे घेत असलेल्या 'एच-6 के' बॉम्बर्स विमानांची द़ृश्ये प्रसारित केली होती, हे येथे उल्लेखनीय!

'साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट'च्या वृत्तानुसार, सहसा बीजिंगच्या जवळपास तैनात असणारी ही लढाऊ विमाने चीनने आता शिनजियांग भागात हलविली आहेत. भारत-चीनदरम्यान वाद असलेल्या भूभागापासून शिनजियांगमधील हा भाग जवळ आहे. दिल्ली या बॉम्बर विमानांच्या टप्प्यात येते म्हटल्यावर चीनकडून भारताला देण्यात आलेली ही थेट धमकीच आहे, असे या वृत्तपत्राशी बोलताना संरक्षणतज्ज्ञ अँथनी वाँग यांनी सांगितले. (China-India dispute)

एक अन्य सामरिकतज्ज्ञ साँग जाँग पिंग म्हणाले की, तशी वेळ आल्यास चिनी लष्कर भारताच्या राजधानीऐवजी टप्प्यातील हवाईतळांवर हल्ला करणे पसंद करेल. चीन नागरी वस्त्यांवर हल्ले करणार नाही. त्यामुळे चीनची दीर्घ पल्ल्याची ही क्षेपणास्त्रे दिल्लीचा वेध घेणार नाहीत.

चीनमध्ये येत्या काही दिवसांत कोरोनाचा प्रकोप आणखी वाढेल, अशी शक्यता आहे. चीन काय, कुठलाही देश एकाचवेळी अशा दोन आघाड्यांवर लढू शकत नाही, असे ज्येष्ठ चिनी लष्करशास्त्र संशोधक झोऊ चेनमिंग यांचे म्हणणे आहे.

चीनने चालू वर्षातील जून महिन्यात लडाखलगत 'स्टिल्थ बॉम्बर जेट एच-20'ची चाचणी घेतली होती. हे विमान रडारच्या टप्प्यात येत नाही आणि लक्ष्याचा थेट भेद करते. चीनचे हे जेट विमान अणुहल्ला करण्यास सक्षम आहे की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT