पिंपरी : पुढारी वृत्तसेवा: फॅब्रिकेशनच्या दुकानात ठेवलेली अवजड मशीन अंगावर पडल्याने एका सहा वर्षीय चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना पिंपळे सौदागर येथे घडली. युवान दौंडकर (वय ६, रा. पिंपळे सौदागर), असे मृत्यू झालेल्या चिमुरड्याचे नाव आहे.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील टोनपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, युवान त्याच्या आईसोबत फॅब्रिकेशन सेंटरमध्ये आला होता.
युवानच्या आईने त्यांची दुचाकी धुण्यासाठी दिल्यानंतर तो खेळत होता. दरम्यान, युवान एका अवजड मशीनला लटकल्याने मशीन त्याच्या अंगावर पडली. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला. युवानला तात्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापुर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. याप्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.