Latest

जनतेची पंतप्रधान मोदींना साथ : मुख्यमंत्री शिंदे

दिनेश चोरगे

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : 'घर घर मोदी, मन मन मोदी' हेच या निकालामुळे सिद्ध झालेले आहे. निवडणुकीपूर्वी काहीजण मोदींचा करिष्मा ओसरला असे म्हणत होते. त्यांच्यावर आरोप-प्रत्यारोप करत होते. मात्र निकाल हा जनतेच्या हातात असतो आणि जनतेने मोदींना साथ दिली हेच आजच्या निकालातून पुन्हा एकदा सिद्ध होत आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी दिली.

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी महत्त्वाच्या मानल्या जाणार्‍या मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणा या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने अभूतपूर्व यश मिळविले. या विजयाबद्दल भाजपचे अभिनंदन करताना शिंदे यांनी विरोधी पक्षावर टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशासाठी केलेले काम आणि अमित शहा यांनी केलेले निवडणुकांचे योग्य नियोजन यामुळेच चारपैकी तीन राज्यांत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला एवढे मोठे यश मिळाल्याचे शिंदे यांनी सांगितले. याच विरोधी पक्षांनी 2014 मध्येही मोदींवर नको नको ते आरोप केले होते.

पण तरीही मोदी निवडून आले. 2019 मध्ये पुन्हा विरोधकांनी एकत्र येऊन 'चौकीदार चोर है' म्हणत आरोप केले. पण तरीही मोदी पुन्हा निवडून आले. 2024 च्या निवडणुकीतही हे सगळे पक्ष एकत्र येऊन मोदींनी विरोध करत आहेत. पण लोकसभेच्या निवडणुकीत पुन्हा मोदीच निवडून येतील, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

SCROLL FOR NEXT