Latest

एक्सप्रेस हायवेच्या मिसिंग लिंकचे काम डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

अमृता चौगुले

लोणावळा : मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे वर लोणावळा ते खालापूर टोल नाका यादरम्यान नव्याने बनत असलेल्या मिसिंग लिंक अर्थात यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग क्षमता वाढ प्रकल्पाचे काम डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण होईल, अशी अपेक्षा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे. या प्रकल्पाच्या पाहणीसाठी ते लोणावळ्यात आले होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज गुरुवारी (दि.१०) लोणावळा येथे मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेच्या मिसिंग लिंक प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली. मिसिंग लेन प्रकल्पाअंतर्गत लोणावळा शहराच्या सरासरी 150 मीटर खोल असलेल्या बोगद्याची मुख्यमंत्र्यांनी यावेळी पाहणी केली. मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून केले जात असून हा आशियातील सर्वात रुंद बोगदा असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. या बोगद्याचे संपूर्ण काम सप्टेंबर 2023 मध्ये पूर्ण होईल. मात्र संपूर्ण मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण होईल असे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबई नागपूर समृद्धी महामार्गचे काम देखील पूर्णत्वाकडे आले असून यातील नागपूर ते शिर्डी हा टप्पा लवकरच वाहतुकीसाठी खुला केला जाणार असल्याचे सांगितले. यावेळी त्यांच्यासमवेत खासदार श्रीरंग बारणे, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे आदी उपस्थित होते.

SCROLL FOR NEXT