Latest

थोडी थोडी बॅटिंग आम्हाला पण येते; एमसीए निवडणूक निमित्ताने मुख्यमंत्री शिंदे यांची फटकेबाजी

अमृता चौगुले

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : 'थोडी थोडी बॅटिंग आम्हाला पण येते. संधी मिळाली की बॅटिंग करतो. तीन महिन्यांपूर्वी आम्ही बॅटिंग केली. सगळ्यांच्याच आशिर्वादाने ती मॅच जिंकली. काहींचे उघडपणे आशिर्वाद होते, काहींचे आतून होते, मनापासून होते, मी काही नाव घेत नाही,' असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी मुंबईत म्हटले.

मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणजेच एमसीएच्या निवडणुकीच्या निमित्ताने शरद पवार आणि आशिष शेलार यांचं पॅनल रिंगणात उतरलं आहे. या निवडणुकीआधी पवार-शेलार पॅनलकडून डिनर डिप्लोमसीचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, मिलिंद नार्वेकर, जितेंद्र आव्हाड, प्रताप सरनाईक हे एकाच व्यासपीठावर होते. या कार्यक्रमात शरद पवारांच्या समोरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजकीय फटकेबाजी केली.

'पवार साहेबांचंही नेहमी मार्गदर्शन असतं, चांगल्या कामाला त्यांचा आशिर्वाद असतो,' असं विधानही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. अंधेरीमध्ये पवार साहेबांनी राजकारणाची परंपरा कायम ठेवण्यासाठी सांगितलं, तो त्यांचा हक्क आहे. पवार साहेबांचा जन्म आणि माझा जन्म साताऱ्याचा जे पवार साहेबांनी सांगितलं ते आम्ही करणार, खेळात राजकारण आणायचं नाही, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.

SCROLL FOR NEXT