Latest

Chhattisgarh Assembly Elections 2023 : मतदानावेळी नक्षल्यांचा दहशतीचा प्रयत्न; सुकमामध्ये स्फोट, जवान जखमी

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात मंगळवारी मतदान सुरू होताच नक्षलवाद्यांनी केलेल्या आयईडी (इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईस) स्फोटात निवडणूक कर्तव्यावर असलेला एक सीआरपीएफ जवान जखमी झाला. सुकमाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी किरण चव्हाण यांनी ही माहिती दिली. हा जवान कोब्रा बटालियनचा असून तो निवडणूक ड्युटीवर तैनात होता. श्रीकांत असे या जवानाचे नाव आहे. (Chhattisgarh Assembly Elections 2023)

कोब्रा २०६ आणि सीआरपीएफचे जवान कॅम्प टोंडामार्का येथून एलमागुंडा गावाकडे जात असताना ही घटना घडली. गस्तीदरम्यान जवानाचा नक्षलवाद्यांनी पेरलेल्या आयईडीवर पाय पडला. यामध्ये त्याच्या पायाला दुखापत झाली. छत्तीसगडमध्ये दोन दिवसांत आयईडी स्फोटाची ही दुसरी घटना आहे. सोमवारी, कांकेरमध्ये बीएसएफचे कॉन्स्टेबल आणि दोन पोलिंग टीम सदस्य प्रेशर आयईडी स्फोटात जखमी झाले. प्रकाश चंद असे जखमी हवालदाराचे नाव असून त्याच्या पायाला दुखापत झाली आहे. दरम्यान, आयईडी स्फोटात दोन्ही मतदान अधिकारी किरकोळ जखमी झाले.

छत्तीसगडमध्ये आज पहिल्या टप्प्यात नक्षलग्रस्त बस्तर विभागासह २० मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. मतदान सुरळीत पार पडावे यासाठी २० मतदारसंघातील संवेदनशील भागात ६०० हून अधिक मतदान केंद्रांसाठी त्रिस्तरीय सुरक्षा कवच प्रदान करण्यात आले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT