नवी दिल्ली : एका अधिकाऱ्याचा एक लाख रुपयांचा मोबाईल पडल्याने चक्क बंधाऱ्यातील २१ लाख लिटर पाण्याचा उपसा केल्याची अजब घटना छत्तीसगडमध्ये घडली असून या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. राजेश बिस्वास असे या अधिकाऱ्याचे नाव असून कांकेर जिल्ह्यात ते अन्न निरीक्षक म्हणून काम पाहतात.
खेरकट्टा या छोट्या धरणावर सहलीसाठी आलेल्या बिस्वास यांचा एक लाख रुपयांचा महागडा मोबाईल पाण्यात पडला. १५ फूट खोल पाण्यात पडलेला हा मोबाईल काढण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांनाही कामाला लावण्यात आले. त्यांनी ३० एचपीचे दोन डिझेल पंप मागवून धरणातील सारे २१ लाख लिटर पाणी उपसून टाकले. एक मोबाईल बाहेर काढण्यासाठी १५०० एकर शेतीला पुरेल एवढे पाणी बाहेर काढले गेले. एका ग्रामस्थाने तक्रार केल्यावर सिंचन विभागाचे अधिकारी धरणावर पोहोचले व हे काम थांबवण्यात आले व त्यांनी पाण्याचा उपसा बंद केला. तोपर्यंत धरणातील पाण्याची पातळी सहा फुटांनी कमी झाली होती. या प्रकरणी बिस्वास यांना निलंबित करण्यात आले आहे. ते म्हणाले की, उपजिल्हाधिकाऱ्यांकडे काही पाणी उपसण्यासाठी परवानगी मागितली होती. तीन- चार फूट पाणी उपसल्याने फार फरक पडणार नाही. उलट कालव्यातून ते पाणी शेतकऱ्यांनाच मिळणार आहे, अशी मखलाशीही त्यांनी केली.