कसबा बावडा, पुढारी वृत्तसेवा : प्रचंड ईर्ष्या आणि चुरशीने श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी रविवारी सात तालुक्यांतील 58 केंद्रांवर मतदान होत आहे. आमदार सतेज पाटील विरुद्ध माजी आमदार महादेवराव महाडिक असा टोकाचा संघर्ष आहे.
संस्था गटासह 21 संचालकांसाठी ही निवडणूक होत आहे. मंगळवारी (दि. 25) मतमोजणी होणार आहे. कारखान्यात सलग 28 वर्षे सत्तेत असलेल्या माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या समोर काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी आव्हान उभे केले आहे. दोन्ही गटांच्या माध्यमातून जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी सभांना हजेरी लावली. साखर कारखान्याच्या निवडणुकीत यावेळी मोठ्या प्रमाणात लक्ष्मीदर्शन झाल्याची चर्चा आहे.
कारखान्याच्या सभासद अपात्रतेपासून दोन्ही गटांत संघर्ष सुरू झाला. कारखान्याच्या सात तालुक्यांतील 122 गावांत प्रचाराचा धुरळा उडाला. प्रचारात ऊस दर, उतारा यांसह व्यक्तिगत वाभाडे काढले गेले.
सन 2015 च्या कारखाना निवडणुकीत सतेज पाटील यांनी महाडिक यांची सत्ता उलथविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. पण महादेवराव महाडिक यांनी राजारामची सत्ता सलग पाचव्यांदा आपल्या ताब्यात ठेवण्यात यश मिळवले. हा विजय मात्र काठावरचा राहिला.
सतेज पाटील यांनी परिवर्तनासाठी कारखान्याचे 12 हजार सभासद विरुद्ध येलूरचे पाचशे सभासद असा लढा असल्याचे सभासदांवर बिंबवण्याचा प्रयत्न केला आहे. 'आमचं ठरलंय, कंडका पाडायचा, उसाला दर मिळवायचा' या नव्या टॅग लाईनसह ते या निवडणुकीला सामोरे जात आहेत.
सत्ताधारी महाडिक गटाची धुरा माजी आ. अमल महाडिक सांभाळत आहेत. त्यांच्याकडून डी. वाय. पाटील कारखान्याच्या दराबाबत प्रश्न उपस्थित करत पाटील यांच्यावर बोचरी टीका केली जात आहे.
शुक्रवारी प्रचार संपल्यानंतर गावोगावी सभासदांच्या भेटी घेऊन दोन्ही गटांकडून साम, दाम, दंड, भेद नीतीचा अवलंब केला जात होता. सात तालुक्यांतील 122 गावांचे कार्यक्षेत्र असलेल्या कारखान्याच्या या निवडणुकीचे पडसाद आगामी राजकारणावर पडणार आहेत.