Latest

ओबीसीतून मराठा आरक्षण मिळू देणार नाही?: छगन भुजबळ

Arun Patil

जालना, पुढारी वृत्तसेवा : ओबीसीमधून मराठा समाजाला कोणत्याही परिस्थितीत आरक्षण मिळू देणार नाही, अशी गर्जना ओबीसी नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी शुक्रवारी केली.

अंबड शहरातील पाचोड रोडवरील धाईतनगर मैदानावर शुक्रवारी ओबीसी, भटके विमुक्त आरक्षण बचाव एल्गार सभेत ते बोलत होते. या सभेत भुजबळ यांनी मनोज जरांगे-पाटील यांचे थेट नाव न घेता त्यांच्यावर एकेरी भाषेत जोरदार टीका केली.

मराठा समाजात एक नवा नेता निर्माण झाला आहे. धनगर, तेली, माळी समाजाला नंतर ओबीसीमध्ये घुसवले, असे तो म्हणतोय. आरक्षण म्हणजे काय ते तर समजून घ्या. आम्हाला घटनेने आरक्षण दिले आहे. आरक्षण न समजणार्‍याने आरक्षण हा गरिबी हटाव कार्यक्रम नाही हे समजून घ्यावे, अशी टीका भुजबळ यांनी केली.

मंडल आयोगाने देशभर फिरून ओबीसींची संख्या 54 टक्के असल्याने त्यांना 27 टक्के आरक्षणाची शिफारस केली. या आयोगाच्या शिफारसी तत्कालीन पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांनी स्वीकारल्या आणि त्याची अंमलबाजवणी शरद पवार यांनी मुख्यमंत्री असताना केली. कोणाला आरक्षण द्यायचे हे पवारांच्या हातात नव्हते, यामुळे त्यांनी कोणाला आरक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रश्न येत नाही, असा खुलासा भुजबळ यांनी केला. मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही; पण ओबीसीला धक्का लागणार नाही, हे पाहिले पाहिजे. यासाठीच आम्ही ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण मिळू देणार नाही, असे भुजबळ यांनी स्पष्ट केले.

राज्यभरात मराठा मोर्चे निघाले, मराठा समाजाला पंजाबराव देशमुख वसतिगृह, अण्णासाहेब पाटील महामंडळ, राजर्षी शाहू विकास योजनेद्वारे हजारो कोटी मिळत आहेत. मात्र, ओबीसी महामंडळाला हजार कोटीदेखील मिळाले नाहीत. मराठा आंदोलनादरम्यान अंतरवाली सराटीत 70 पोलिस जखमी झाले, असे सांगितले जाते. ते काय पाय घसरून पडले का? असा सवाल भुजबळ यांनी केला. पोलिसांवर हल्ला झाल्यानंतर त्यांनी काय करायचे? त्यांची बाजू कोणीच घेतली नाही. उलट गृहमंत्र्यांनी माफी मागितली, या प्रकरणात खरे चित्र राज्यासमोर आले नाही, असा आरोप भुजबळ यांनी केला.

तोडफोड, जाळपोळसाठी कोड नंबर

बीड जिल्ह्यात आमदार सोळंके, क्षीरसागर यांच्या घरांवर हल्ले झाले. बीडजवळील सुभाष राऊत यांचे हॉटेल फोडले. तोडफोड व जाळपोळसाठी कोड नंबर देण्यात आले होते, असा आरोप त्यांनी केला.

यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, रासप नेते महादेव जानकर, आ. गोपीचंद पडळकर, ओबीसी नेते प्रकाश शेंडगे, बबनराव तायवाडे, माजी आ. आशिष देशमुख, लक्ष्मण गायकवाड, माजी आ. नारायणराव मुंडे, शब्बीर अन्सारी आदींची प्रमुख उपस्थिती होती.

पडळकरांचा भुजबळांसमोरच शरद पवार यांच्यावर हल्लाबोल

ओबीसींच्या एल्गार परिषदेत भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी मराठा आरक्षणावरून मंत्री छगन भुजबळ यांच्यासमोरच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली. मराठा समाजाची वाताहत कुणी केली? तुमचा खरा शत्रू ओबीसी नाही. तुम्हीच तुमचा खरा शत्रू ओळखा, असे ते म्हणाले. मराठा समाजातील गरिबांना आरक्षण मिळाले पाहिजे. आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही; पण त्यांना 346 जाती असणार्‍या ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण द्या. ओबीसी आरक्षणाला धक्का लागल्यास अवघा महाराष्ट्र पेटून उठेल, असा इशारा त्यांनी दिला.

SCROLL FOR NEXT