Latest

Cheteshwar Pujara Record : पुजाराने तिसरे द्विशतक फटकावून मोडला 118 वर्षांचा विक्रम!

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताचा चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) यंदा कौंटी क्रिकेटमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. ससेक्ससाठी पुजाराने शानदार फलंदाजी केली आहे. संघाचा कर्णधार बनल्यानंतर त्याने पहिल्याच डावात धडाकेबाज द्विशतक झळकावले. मिडलसेक्स संघाच्या गोलंदाजांना त्याने अक्षरश: घाम फोडला. लॉर्ड्सच्या मैदानावरची त्याची संस्मरणीय खेळी पाहून इंग्लंड क्रिकेटच्या दिग्गजांसह उपस्थित प्रेक्षकही वेडे झाले. पुजारा बाद झाल्यानंतर त्याच्या सन्मानार्थ सर्वांनी जागेवर उभाराहून टाळ्यांचा कडकडाट केला. ससेक्सकडून खेळताना पुजाराने या मोसमात 7 सामन्यात 950 हून अधिक धावा केल्या आहेत.

लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर मिडलसेक्स आणि ससेक्स यांच्यात सामना सुरू आहे. या सामन्यात चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) ससेक्सचे नेतृत्व करत आहे, पुजाराने सामन्याच्या दुसऱ्या दिवशी आपले द्विशतक पूर्ण केले. त्याने आपल्या डावात एकूण 403 चेंडू खेळले, ज्यामध्ये त्याने 21 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने एकूण 231 धावा फटकावल्या. मिडलसेक्सकडून पाच बळी घेणाऱ्या टॉम हेल्मने पुजाराची विकेट घेतली. स्टोनमन याने त्याचा झेल पकडला. आपल्या संघासाठी बाद होणारा तो शेवटचा फलंदाज होता. पॅव्हेलियनमध्ये परतताना मैदानात उपस्थित असणा-या प्रत्येकाने उभा राहून टाळ्या वाजवल्या. सामन्याच्या थेट प्रक्षेपणात हे क्षण दाखवण्यात आले नाहीत, मात्र स्टेडियमच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही छायाचित्रे शेअर करण्यात आली आहेत. यासोबतच 'लॉर्ड्सवर पुजाराची 231 धावांची खेळी ही एक संस्मरणीय खेळी आहे,' असे लिहिले आहे.

पुजाराचे (Cheteshwar Pujara) हे सात कौंटी सामन्यांमधील पाचवे शतक आहे. त्याने ससेक्ससाठी या मोसमात 10 डावांत तीन द्विशतके झळकावली आहेत. ससेक्स संघाच्या इतिहासात 118 वर्षात एकाच मोसमात तीन द्विशतके झळकावणारा पुजारा पहिला फलंदाज ठरला आहे. भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर येण्यापूर्वी पुजाराने दोन द्विशतके झळकावली होती. डर्बीशायरविरुद्ध त्याने 387 चेंडूत 201 धावा केल्या होत्या. यानंतर डरहमविरुद्ध 334 चेंडूत 203 धावा केल्या. याशिवाय त्याने या मोसमात 170 आणि 109 धावांची खेळीही साकारली आहे. काऊंटी चॅम्पियनशिप 2022 मध्ये पुजाराने आतापर्यंत 6, 201*, 109, 12, 203, 16, 170*, 3, 46, 231 धावा केल्या आहेत.

पहिल्या डावात ससेक्सचा 523 धावांचा डोंगर

पुजाराच्या (Cheteshwar Pujara) फलंदाजीच्या जोरावर ससेक्सने सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या डावात 523 धावांचा डोंगर रचला. त्याने टॉम अलस्पासोबत तिसऱ्या विकेटसाठी 219 धावांची भागीदारी केली. पुजारा फलंदाजीला आला तेव्हा ससेक्सने 35 षटकांत 99 धावांत 2 विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर पुजारा-टॉम अलस्पा जोडीने डाव सांभाळला. टॉमने 277 चेंडूत 135 धावा केल्या. या खेळीत त्याने 15 चौकारही मारले. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा मिडलसेक्सने पहिल्या डावात एकही विकेट न गमावता 103 धावा केल्या.

SCROLL FOR NEXT