Latest

Health insurance : आरोग्य विम्यात व्यापक बदल; ‘हे’ हाेतील फायदे

Arun Patil

नवे वर्ष 2024 हे अनेक नव्या बदलांसह सुरू झाले आहे. यातील बदल जाणून घेणे आवश्यक आहेत. यात आरोग्य विम्यातील Health insurance बदलाचा समावेश आहे.

'सीआयएस' आणि त्याचे फायदे

'सीआयएस'मध्ये कस्टमर इन्फॉर्मेशन शीट हे एक नवीन डॉक्युमेंट असून ते 1 जानेवारीपासून लागू झाले आहे. यानुसार पॉलिसीधारकाला त्याचा थेट फायदा मिळेल. सीआयएस ही पॉलिसीधारकाला हेल्थ पॉलिसी समजण्यास मदत करेल. प्रत्येक पॉलिसीधारकाला पॉलिसी खरेदी करताना 'सीआयएस' उपलब्ध करुन दिले जाईल. यात पॉलिसीधारकाला Health insurance आवश्यक माहितीचा गोषवारा असेल. एकुणातच या डॉक्यूमेंटमुळे सोप्या भाषेत विमा पॉलिसी समजण्यास हातभार लागेल. इर्डा म्हणजेच 'इन्शूरन्स रेगुलेटरी अँड डेव्हलपमेंट अथोरिटी ऑफ इंडिया' च्या गाईडलाइन्सनुसार सीआयएस असेल. कस्टमर इन्फॉरमेशन शीटमुळे विमा योजना अधिक पारदर्शी आणि यूजर फे्रंडली होतील.

'सीआयएस'मध्ये काय असेल?

'सीआयएस'मध्ये विमा पॉलिसीशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टींचा उल्लेख असेल. या तरतुदीमुळे पॉलिसीधारक आणि विमा कंपन्यांत पारदर्शकता राहण्याबरोबरच विश्वासही वृद्धिगंत होईल. जागरूकताही वाढेल. यामुळे पॉलिसीधारक सर्व समस्यांचे समाधान स्वत:च करू शकतील. 'सीआयएस'मध्ये पॉलिसीचे नाव, प्रकार, कवचची माहिती, दाव्यासाठी वेटिंग पीरियडची माहिती, पॉलिसीची मर्यादा, सवलती, फ्री लूक पीरियडची माहिती, मायग्रेशन, पोर्टेबिलीटी, लॉकिंग पीरियड किंवा मोरेटोरियम पीरियड, दावा करण्याची पद्धत आणि विमा कंपनीच्या फोन क्रमांकांची माहिती तसेच तक्रार करण्यासाठी लिंक्स यासारख्या गोष्टींची माहिती असेल. थोडक्यात काय, तर एखाद्या पॉलिसीधारकाला एका विमा पॉलिसीविषयी जेवढी माहिती असणे आवश्यक आहे, ती थोडक्यात उपलब्ध असेल. या सुविधांमुळे खरेदी केलेल्या पॉलिसीवरचा आणखी विश्वास वाढेल.

आता नव्या वर्षात ग्राहकांना बरेच अधिकार दिले आहेत. यानुसार फ्री लूक पीरियडचा लाभ घेत आपण पंधरा दिवसांत पॉलिसीही रद्द करू शकतो. मायग्रेशन, पोर्टेबिलीटी, मोरेटोरियम पीरियड, दावा करण्यासाठी मदत अणि अन्य तक्रारीसाठी हेल्पलाईन नंबर सुविधा यादेखील उपलब्ध राहतील. विमा घेणारे या सुविधांचा वापर सहजपणे करू शकतील.

पॉलिसीधारकांची जबाबदारी

इन्श्युरन्स रेग्युलेटर 'इर्डा'च्या गाईडलाईन्सनुसार पॉलिसीधारकाने आपल्या आरोग्याची अचूक माहिती कंपनीला देणे गरजेचे आहे. संपूर्ण पारदर्शकतेसह आपल्या स्थितीचे विवरण सादर करावे लागणार आहे. यानुसार कृती न केल्यास पॉलिसी रद्द होऊ शकते. याशिवाय विमा कंपनीने पॉलिसीधारकाकडून 'सीआयएस'चे संपूर्णपणे आकलन झाल्याचे लिखित रूपाने कन्फर्मेशन घेत त्यावर स्वाक्षरी घेणे गरजेचे आहे. या पारदर्शक कारभारामुळे पॉलिसीवरचे संभाव्य वाददेखील कमी होईल. त्यामुळे विमा खरेदी अणि दावा करण्याचा ग्राहकांचा अनुभव हा खूपच समाधानकारक राहू शकतो.फ

आणखी कोणती खास सुविधा?

'इर्डा'च्या नियमानुसार पॉलिसी खरेदी करताना पंधरा दिवसांचा फ्री लूक पीरियड दिला जाईल. यानुसार पॉलिसीधारकाला पंधरा दिवसांपर्यंत पॉलिसीची इत्यंभूत माहिती घेता येईल अणि त्यानुसार पॉलिसी सुरू ठेवायची की नाही, याचा निर्णय घेऊ शकतो. 'सीआयएस'ची सोपी भाषा आणि पंधरा दिवसांचा कालावधी या दोन्ही बाबींमुळे पॉलिसीधारकांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही, याची खबरदारी घेतली गेली आहे. पॉलिसीचे आकलन केल्यानंतर आणि समाधान झाल्यानंतरच संबंधित पॉलिसी सुरू ठेवायची नाही, याबाबत ग्राहक निर्णय घेऊ शकतात. याप्रमाणे चुकीची पॉलिसी माथी मारणे किंवा पॉलिसी खरेदीस भाग पाडणे, यांसारख्या अनुभवातून ग्राहकांची सुटका होईल आणि खरेदीत पारदर्शकता राहील.

SCROLL FOR NEXT