Latest

Chandrayaan-3 Moon Landing Live Updates | चांद्रयान-३ आजच चंद्रावर उतरणार, इस्रोची माहिती

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : गेल्या 40 दिवसांपासून प्रत्येक भारतीय ज्या ऐतिहासिक प्रसंगाची वाट पाहात आहे, ते चंद्रारोहण अवघ्या काही तासांवर येऊन ठेपले आहे. आज (दि.२३) सायंकाळी निर्धारित वेळेनुसार सहा वाजून चार मिनिटांनी भारताचे 'चांद्रयान' चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरेल. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारे पहिले यान भारताचे असणार आहे. तसेच चंद्रावर पोहोचणारा भारत हा चौथा देश ठरणार आहे. (Chandrayaan-3 Moon Landing Live Updates)

14 जुलै रोजी श्रीहरीकोटा येथून झेपावलेले चांद्रयान 40 दिवसांनी चंद्रावर उतरणार आहे. आज (दि.२३) सायंकाळी सहा वाजून चार मिनिटांनी चांद्रयानाचे विक्रम लँडर चंद्रावर उतरणार असून, त्याच्या अर्धा तास आधी अंतिम टप्प्याला प्रारंभ होईल. बंगळूरच्या 'इस्रो'च्या मिशन ऑपरेशन कॉम्प्लेक्स अर्थात मुख्य नियंत्रण कक्षातून या सॉफ्ट लँडिंगची सारी सूत्रे हाताळली जाणार आहेत.

चांद्रयान-2 मोहिमेत राहिलेल्या त्रुटी दूर करून ही मोहीम आखण्यात आल्याने यावेळी कोेणत्याही परिस्थितीत चांद्रयान चंद्रावर उतरेल याची वैज्ञानिकांना खात्री आहे. इस्रोने मंगळवारी ट्विट करून चांद्रयान निर्धारित कार्यक्रमानुसार चंद्राभोवती प्रदक्षिणा मारत आहे. त्याची सर्व यंत्रणा नियमित तपासली जात आहे. सारे मिशन निर्धारित वेळेनुसार सुरू आहे, असे म्हटले आहे. बंगळूरमधील मिशन ऑपरेशन कॉम्प्लेक्स अर्थात मुख्य नियंत्रण कक्ष शेवटच्या टप्प्यासाठी उत्सुक आणि उत्साही असल्याचेही इस्रोने नमूद केले आहे.

Chandrayaan 3 Live Streaming : 20 मिनिटांचा थरार असेल कसोटीचा

बुधवारी चांद्रयान-3 चे विक्रम लँडर चंद्रावर प्रत्यक्ष उतरण्याआधीची शेवटची 20 मिनिटे इस्रोच्या वैज्ञानिकांसाठी आणि तमाम भारतीयांसाठी अत्यंत महत्त्वाची असणार आहे. टी-20 च्या सामन्याच्या उत्कंठावर्धक शेवटपेक्षाही थरारक असा हा टप्पा असणार आहे.

  • विक्रम जेव्हा चंद्रापासून 25 कि.मी. अंतरावर असेल तेव्हा बंगळूरच्या कमांड सेंटरमधून सूचना मिळताच विक्रम लँडर खाली यायला सुरुवात येईल.
  • त्यावेळी त्याचा वेग भयंकर म्हणजे 6048 किमी प्रतितास अर्थात 1.68 किमी प्रतिसेकंद एवढा असेल. हा वेग विमानाच्या वेगाच्या दहापट असेल.
  • यानंतर विक्रम लँडरची इंजिन्स सुरू होतील. त्यामुळे ते त्याचा वेग कमी करून त्याला चंद्राला समांतर ठेवतील. ही प्रक्रिया तब्बल 11 मिनिटांची असेल.
  • या प्रक्रियेदरम्यान विक्रम लँडर सुचनांनुसार हवेत बाजू बदलत आपले पाय चंद्राच्या पृष्ठभागाच्या 90 अंशात आणेल. म्हणजे त्यावेळी विक्रम लँडर उभे असेल.
  • चंद्रापासून 800 मीटर उंचीवर यान आल्यावर त्याची गती शून्य होईल. ते हळूहळू 150 मीटर उंचीवर येउन स्थिरावेल.
  • त्याच वेळी विक्रम लँडर खालच्या चंद्राच्या पृष्ठभागाची छायाचित्रे घेत पृष्ठभागाचे विश्लेषण करून कमीत कमी धोक्याची आणि उतरण्यास सुयोग्य अशी जागा शोधेल.
  • जागा निश्चित केल्यावर विक्रम लँडरची चारपैकी दोन इंजिन बंद होतील. आणि ते 3 मीटर प्रतिसेकंद या वेगाने खाली येईल व पायांवर ते चंद्रावर उतरेल.
  • लँडरच्या सेन्सरने चंद्राचा पृष्ठभागाचा स्पर्श झाल्याचे कळवताच उरलेली दोन्ही इंजिनही बंद होतील.

लँडिंगचा क्षण लाईव्ह पाहण्याची संधी

चांद्रयानाचे लँडिंग पाहता येणार आहे. इस्रो आज (दि.२३) सायंकाळी 5 वाजून 20 मिनिटांनी आपल्या मिशन ऑपरेशन कॉम्प्लेक्स अर्थात मुख्य नियंत्रण कक्षातून थेट प्रक्षेपण करणार आहे.

इस्रोचे यू ट्यूब चॅनल, इन्स्टाग्राम, एक्स खाते ट्विटर) आणि फेसबुक पेजवरून ते सर्वांना पाहता येणार आहे. इस्रोच्या वेबसाईटवरही क्षणाक्षणाची माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे.

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाण्याचा शोध घेण्यासोबतच तेथील भूगर्भातील हालचाली, खनिजांचा शोध आदी कामे विक्रम लँडरवरील रोव्हर करणार आहे. मानवाला हवी असलेली आणि ठाऊक नसलेलीही अशी खनिजे चंद्रावर मिळू शकतात, असा अभ्यासकांचा होरा आहे. तसेच ग्राऊंड झिरोवरून चंद्राची छायाचित्रे टिपली जाणार असून, त्यातून तेथील भौगोलिक रचनेबाबत माहिती हाती येणार आहे.

Chandrayaan-3 Moon Landing Live Updates :

आज (दि.२३ ऑगस्ट) सायंकाळी ६ वाजून ४ मिनिटांचा विक्रम लँडर लँडिंगचा टप्पा हा अतिशय महत्त्वाचा आहे. दरम्यान, चांद्रयान-३ चे लँडर मॉड्यूल आजच चंद्रावर उतरणार असल्याची माहिती इस्रोने दिली आहे. यासंदर्भातील इस्रोने एक्सवर (ट्विटरवर) पोस्ट केली आहे. इस्रोने दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, ऑटोमॅटिक लँडिंग सिक्वेन्स (ALS) सुरू करण्यासाठी सर्व तयार आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर निश्चित केलेल्या बिंदुवर लँडर मॉड्यूल (LM) च्या आगमनाची प्रतीक्षा करत आहे. हे लँडर मॉड्यूल आज सायंकाळी ५ वाजून, ४४ मिनिटांनी निश्चित केलेल्या बिंदूवर येऊन लैंडिंग प्रक्रियेला सुरूवात करेल असे इस्रोने सांगितले आहे. यासंदर्भातील लाईव्ह थेट प्रक्षेपण ५ वाजून २० मिनिटांनी सुरू होईल, असेही इस्रोने म्हटले आहे.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT