Latest

Chandrakant Patil | मुलींना आता मोफत उच्च शिक्षण

अंजली राऊत

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

जून २०२४ पासून महाराष्ट्रातील एकाही विद्यार्थिनीला उच्च शिक्षणाच्या अभ्यासक्रमासाठी कोणतेही शैक्षणिक शुल्क भरावे लागणार नाही. जवळपास ८०० अभ्यासक्रमांसाठी ही सवलत लागू राहणार असल्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात योगशास्त्र विभागाचे आणि शिक्षणशास्त्र विभागाच्या इमारतीचे उद्घाटन चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 9) झाले. यावेळी ते बोलत होते. पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, कुलगुरू व्ही. एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरू एस. इंगळे उपस्थित होते.

उद‌्घाटनानंतर झालेल्या समारंभात पाटील म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त महत्त्वाची घोषणा करावयाची आहे. शिंदे हे स्वत: संवेदनशील असल्याने परभणीतील विद्यार्थिनीच्या आत्महत्येनंतर त्यांनी मुलींच्या शुल्कमाफीविषयी चर्चा केली होती. त्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला असून, अभियांत्रिकी, वैद्यकीय, विधी, अशा विविध प्रकारच्या सध्याच्या ६४२ आणि नव्याने सुरू होणाऱ्या २०० अभ्यासक्रमांसाठी महाराष्ट्रात एकाही विद्यार्थिनीला शुल्क भरावे लागणार नाही. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला स्थापनेनंतर शिक्षकांची नवीन पदे मंजूर झाली नाहीत. ही परिस्थिती लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी मंत्रालयात तातडीची बैठक घेऊन दिलेले प्रस्ताव आणि त्यांची स्थिती याबाबत वस्तुस्थिती जाणून घेण्याचे आश्वासन दिले. अध्यक्षीय भाषणात कुलगुरू व्ही. एल. माहेश्वरी यांनी विद्यापीठाच्या वाटचालीचा आढावा घेतला. कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी आभार मानले. मंचावर व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. एस. टी. भुकन, प्रा. सतीश कोल्हे, प्रा. शिवाजी पाटील, ॲड. अमोल पाटील, डॉ. पवित्रा पाटील, सहसंचालक डॉ. संजय ठाकरे आदी उपस्थित होते.

राष्ट्रीय शिक्षण धोरण राबविण्यात राज्य प्रथम स्थानी 
गेल्या दीड वर्षांत नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबविण्यात महाराष्ट्र राज्य पहिल्या क्रमांकावर आहे. या धोरणात प्रात्यक्षिकावर अधिक भर देण्यात आला आहे. इंटर्नशिप बंधनकारक आहे. अगदी ग्रामीण भागातील विद्यार्थी ग्रामपंचायत कार्यालयात इंटर्नशिपचा अनुभव घेऊ शकतील. या धोरणात ७० टक्के अभ्यासक्रम हा विषयाशी निगडीत असला, तरी ३० टक्के अभ्यासक्रम हा व्यक्तिमत्त्व विकासाला पूरक ठरणारा असल्याचे पाटील म्हणाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT