Latest

चंद्रकांत पाटील यांनी किशोर आवारे यांच्या नातलगांचे केले सांत्वन

अमृता चौगुले

तळेगाव दाभाडे :  पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी(दि.१६) मयत किशोर आवारे यांच्या नातलगांची भेट घेवून सांत्वन केले. किशोर आवारे हे चांगले कार्यकर्ते होते ते दीन दुबळ्यांची आणि सर्व सामान्यांची कामे करीत होते. त्यांची झालेली हत्या ही निंदनीय आहे. या हत्याप्रकरणातून कोणीही सुटणार नाही. जे कोणी आरोपी असतील त्यांना कडक शासन झालेच पाहिजे. त्यासाठी मी स्वतः जातीने लक्ष घालणार आहे असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. यावेळी ते भावूक झाले होते. यावेळी माजी राज्य मंत्री बाळा भेगडे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे,तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र जांभुळकर, चंद्रकांत शेटे, किरण राक्षे आदी उपस्थित होते.

यावेळी किशोर आवारे यांच्या मातोश्री माजी नगराध्यक्षा सुलोचनाताई आवारे ,पत्नी विद्या आवारे, भाऊ रवींद्र आवारे, मुलगी प्रियंका आवारे, मामा बाळासाहेब काकडे, रामदास काकडे, गणेश काकडे यांनी हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली. चंद्रकांत पाटील आवारे यांच्या निवासस्थानातून बाहेर पडल्यानंतर उपस्थित महिलांनी किशोर भाऊ यांना न्याय देण्याची मागणी केली.किशोरभाऊ गरिबांचे कैवारी होते, आमचे ते दैवत होते. आमच्या भाऊंना न्याय द्या, अशी मागणी स्त्रीशक्ती भाजी मार्केटच्या अध्यक्ष संगीता डूबे यांनी केली.

SCROLL FOR NEXT