Latest

डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील करणार ठाकरे गटात प्रवेश

Arun Patil

सांगली, पुढारी वृत्तसेवा : अखेर डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील प्रवेशावर शिक्कामोर्तब झाले आहे. याबाबतच्या वृत्ताला पै. चंद्रहार पाटील यांनी दुजोरा दिला आहे. जिल्हाभरातील कार्यकर्त्यांसह सोमवारी (दि. 11) दुपारी तीन वाजता मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ते पक्ष प्रवेश करणार आहेत. यासाठी जिल्हाभरातून शक्तिप्रदर्शन करीत कार्यकर्ते रवाना होणार आहेत.

लोकसभेच्या आखाड्यात उतरणार यावर चंद्रहार पाटील पहिल्यापासून ठाम आहेत. गेल्या वर्षभरापासून ते लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी करीत आहेत. बैलगाडा शर्यत, रक्तदान शिबिर महारॅली, गावोगावी संपर्क अभियान राबवून त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा मनसुबा अगोदरच व्यक्त केला होता.

गेल्या काही दिवसांपासून चंद्रहार पाटील यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील प्रवेशाच्या चर्चा सुरु होत्या. आज या चर्चेला पूर्णविराम मिळाला. याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख संजय विभुते यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही प्रवेशाच्या वृत्ताला दुजोरा दिला.

लोकसभा लढवायचा निर्णय पक्का केल्यानंतर त्यांनी विविध पक्षाच्या नेत्यांच्या भेटीगाटी घेऊन चर्चा केली होती. विशेषतः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांच्याशी त्यांचा सातत्याने संपर्क होता. मात्र लोकसभा सांगली मतदारसंघातून तिकीटाची हमी मिळाल्याशिवाय पक्ष प्रवेश करायचा नाही, असा त्यांचा प्रयत्न होता. त्यासाठी त्यांनी पक्ष श्रेष्ठींसोबत दोन-तीन चर्चेच्या फेर्‍या केल्या. मातोश्रीवर भेट देऊन त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर पक्षाचे नेते खा. संजय राऊत यांच्याशीही त्यांच्या वारंवार चर्चा होत होत्या. अखेर शनिवारी पुण्यात खा. राऊत यांच्यासमवेत चर्चा झाल्यानंतर पाटील यांच्या प्रवेशावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

त्यानंतर पाटील यांनी मतदारसंघात परत येऊन प्रवेशाच्या तयारीला सुरूवात केली आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख संजय विभुते यांच्याशी चर्चा करुन त्यांनी सोमवारी प्रवेश निश्चित केला आहे. जिल्हाभरातील कार्यकर्त्यांना तसे निरोप द्यायला सुरूवात केली आहे.

विभुते यांनी उद्या दुपारी मातोश्रीवर पाटील यांचा पक्ष प्रवेश होत आहे. आपण सध्या त्यांच्या समवेत आहे. दौर्‍याचे नियोजन सुरू असल्याची माहिती दिली.

इरादा कायम

चंद्रहार पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. आपण कार्यकत्यांसह शिवसेनेत प्रवेश करीत आहोत. सांगली लोकसभा निवडणूक लढवण्याचा आपला इरादा कायम आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपल्याला संधी देतील, असा विश्वास आहे, असे पाटील यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT