Latest

चांदोली धरण 100 टक्के भरले; धरण क्षेत्रात पाऊस, सतर्कतेचा इशारा

Arun Patil

शित्तूर वारुण, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर व सांगली जिल्ह्याच्या सीमेवर असलेले चांदोली धरण 34.40 टीएमसी म्हणजेच पूर्ण क्षमतेने 100 टक्के भरलेले आहे. महिन्याभरापासून दडी मारलेल्या पावसाने धरण क्षेत्रात पुन्हा सुरुवात केल्यामुळे धरणात सध्या 3,770 क्यूसेकने पाण्याची आवक सुरू आहे. महिन्यापासून बंद असलेली वीजनिर्मिती मंगळवारी सायंकाळपासून पूर्ववत सुरू करण्यात आली असून वीजनिर्मिती केंद्रातून सध्या 457 क्यूसेक पाण्याचा विसर्ग वारणा नदी पात्रात होत आहे.

धरण प्रशासनाने पावसाचा अंदाज घेत केलेल्या काटेकोर नियोजनामुळेच धरण याहीवर्षी 100 टक्के भरलेले आहे. त्यामुळे धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढले, तर मात्र सांडव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू करावा लागणार असल्यामुळे नदीकाठच्या गावांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन धरण प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

सध्या धरणाची पाणी पातळी 626.90 मीटरवर पोहोचली असून धरणात 974.188 द.ल.घ.मी. पाणीसाठा झाला आहे. क्षेत्रात गेल्या चोवीस तासांत 37, तर आजअखेर 1657 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसामुळे पोटरीत आलेल्या भात पिकाला जीवदान मिळाले आहे. त्यामुळे बळिराजाही सुखावला आहे.

SCROLL FOR NEXT