पुणे; पुढारी वृत्तसेवा : मंत्रालयात स्तरावर मे महिना सुरू झाल्यामुळे बदल्यांसाठी इच्छुकांच्या मुंबई वार्या सुरू झाल्या आहेत. त्यामध्ये सरकार कोणतेही असो, वर्षानुवर्षे आम्ही पुण्यातच शासकीय सेवेचा हक्क बजावणार असा चंग बांधून तळ ठोकलेल्या सहकार विभागातील 'त्या' अधिकार्यांना इतर जिल्ह्यांमध्ये हलविण्याचे आव्हान सहकारमंत्री अतुल सावे आणि सहकारचे अपर मुख्य सचिव अनुप कुमार यांच्यासमोर आहे.
सहकाराची पंढरी म्हणून देशात महाराष्ट्र राज्य अग्रेसर आहे. तर राज्यात पुणे हे सहकाराचे मुख्य केंद्रबिंदू आहे. सहकार आयुक्तालय पुण्यात असल्याने मुख्यालय आणि विभागीय, जिल्हा व शहर कार्यालयांमध्ये वर्षानुवर्षे तळ ठोकून अनेकांनी 15 ते 20 वर्षांची सेवा बजावली आहे. त्यामुळे सहकारातील त्यांच्या प्रदीर्घ अनुभव व ज्ञानाचा खरा फायदा राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये होण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
राज्यांत अगदी खेडोपाड्यांमध्ये जाऊन काम करणार्या सहकार विभागामधील प्रामाणिक अधिकार्यांनाही पुण्यात येऊन काम करण्याची इच्छा असते. मात्र, पुणे मुख्यालयांतर्गत तळ ठोकलेल्या अधिकार्यांचे 'वजन' अधिक राहत असल्याने अन्य जिल्ह्यांतील अधिकार्यांना पुण्यात काम करण्याची संधी कमीच मिळत असल्याची खदखद अनेकजण उघडपणे बोलून दाखवितात. मंत्रालयस्तरावर पाच सह निबंधकांच्या बढत्यांवर शिक्कामोर्तब झाले असून, ते लवकरच अपर निबंधक होतील.
त्यामुळे अशा अधिकार्यांच्या जागी आपली वर्णी पुण्यातच व्हावी यासाठी मंत्रालयस्तरावर पुण्यातीलच काही अधिकार्यांनी फिल्डिंग लावल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे पुण्यात कोणत्या अधिकार्याची किती वर्षे सेवा झाली याबाबतची यादी सहकारमंत्री व सहकारच्या अपर मुख्य सचिवांनी सहकार आयुक्तालयातून मागवून योग्य त्या ठिकाणी बदली आदेश करण्याचा नवा पायंडा सुरू करण्याची मागणीही होत आहे. शिवाय ज्या ठिकाणी सहकार विभागाचे पद मंजूर आहेत, त्याच दर्जाचा अधिकारी पणन संचालनालय व साखर आयुक्तालय अथवा प्रति नियुक्तीने नियुक्त करण्यात येणार्या पदांवर देण्याचीही मागणी होत आहे.