Latest

IND vs BAN, World Cup 2023 : भारतासमोर ‘अंडरडॉग’ बांगला देशचे आव्हान

अमृता चौगुले

पुणे : यंदाच्या आयसीसी विश्वचषक स्पर्धेत सलग 3 सामने जिंकून थाटात सुरुवात करणार्‍या भारतासमोर आज कट्टर प्रतिस्पर्धी बांगला देशचे आव्हान असणार आहे. बांगला देशने मागील 4 वन डे सामन्यांत भारताचा चक्क 3 वेळा पराभव केला असून, या पार्श्वभूमीवर भारताला सर्व आघाड्यांवर दक्ष राहावे लागेल, हे निश्चित आहे. यंदा दक्षिण आफि—का व इंग्लंडची पळता भुई थोडी करणार्‍या अफगाणिस्तान व नेदरलँड संघांचा कित्ता भारताविरुद्ध गाजवण्याचे लक्ष्य बांगला देशचे असू शकते. साहजिकच, अंडरडॉग बांगला देशचा संघ कोणत्याही वळणावर धोकादायक ठरू शकतो, हेदेखील रोहितसेनेला येथे विसरून चालणार नाही. आजच्या लढतीला दुपारी 2 वाजता येथील गेहुंजे स्टेडियमवर सुरुवात होईल.

फलंदाजीच्या आघाडीवर, कर्णधार रोहित शर्मा आपला धडाकेबाज फॉर्म या लढतीतदेखील कायम राखण्यासाठी महत्त्वाकांक्षी असेल. याचवेळी शुभमन गिल व विराट कोहली हे आघाडीचे फलंदाजही मोठी खेळी साकारण्यासाठी निर्धाराने मैदानात उतरतील, अशी अपेक्षा आहे. विशेषत: रोहितने पाकिस्तानविरुद्ध 86 तर अफगाणविरुद्ध 131 धावांच्या खेळीसह आपला धडाका दाखवून दिला आहे. भारतीय संघ तूर्तास गुणतालिकेत दुसर्‍या स्थानी विराजमान असून सरासरी उंचावणे हे संघाचे लक्ष्य सेल.

यापूर्वी, पाकिस्तानविरुद्ध महत्त्वाच्या लढतीत विराटचा फटका चुकला आणि निराशा झाली. पण, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 85 आणि अफगाणविरुद्ध नाबाद 55 धावांची सामना जिंकून देणारी त्याची खेळी लक्षवेधी ठरली आहे. अन्य फलंदाजांमध्ये श्रेयस अय्यरने पाकिस्तानविरुद्ध नाबाद अर्धशतक झळकावत भारतीय फलंदाजी बहरात असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. साहजिकच, भारत विजयी संघात बदल करण्याची फारशी शक्यता सामन्याच्या पूर्वसंध्येपर्यंत तरी चर्चेत नव्हती.

महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवरील या लढतीत फलंदाजीला पोषक वातावरण अपेक्षित आहे. आजवर भारताने या मैदानात भारताने 7 वन डे सामने खेळले असून त्यात 4 विजय नोंदवले आहेत. भारतीय संघ आज बांगला देशविरुद्ध विजयासाठी निश्चितपणाने प्रबळ दावेदार असेल आणि यासाठी भक्कम गोलंदाजी हा मजबूत दुवा असणार आहे. भारताने यापूर्वी ऑस्ट्रेलियाला 199 तर पाकिस्तानला 191 अशा किरकोळ धावसंख्येत रोखत याचे दाखले दिले आहेत. भारताने आतापर्यंतचे तिन्ही सामने जिंकत क्लीन स्विप नोंदवला आहे. मात्र, यापुढील लढतीत अल्पसंतुष्टतेचा कुठेही फटका बसू नये, यासाठी संघाला साहजिकच दक्ष राहावे लागणार आहे.

दुसरीकडे, बांगला देशचा संघ त्यांचा सर्वोत्तम खेळाडू व कर्णधार शकीब हसनवरच मुख्यत्वेकरून अवलंबून आहे. शकीब डाव्या पायाच्या दुखापतीतून सध्याच सावरला असून आजच्या लढतीत निवडीसाठी तो उपलब्ध असणार आहे. यापूर्वी मंगळवारी सराव शिबिरात मात्र तो गोलंदाजी करताना दिसून आला नव्हता. लिंटन दास, मेहदी हसन मिराझ यांनी प्रत्येकी एक अर्धशतक झळकावले आहे. मात्र, नजमूल, तौहिद यांच्याकडून त्यांना अधिक अपेक्षा असतील. मुशफिकूर रहीम यापुढेही मध्यफळीत उत्तम योगदान देऊ शकतो. गोलंदाजीत तस्कीन अहमदने निराशा केली असल्याने याचा बांगला देशला मोठा फटका बसला आहे.

बांगला देशचे गोलंदाज व रोहित यांच्यातच खरा सामना?

भारताविरुद्ध महत्त्वपूर्ण लढतीच्या पाश्वभूमीवर, बांगला देशने कर्णधार रोहित शर्मावरच सर्वाधिक लक्ष केंद्रित केले असून त्याला स्वस्तात बाद करणे हाच त्यांचा प्लॅन ए असू शकेल, असे स्पष्ट संकेत आहेत. रोहितने यापूर्वी सलग दोन विश्वचषक स्पर्धेत बांगला देशविरुद्ध शतकी खेळी साकारत त्यांना आपल्या बॅटीचे पाणी पाजले आहे आणि आजही त्याचा इरादा यापेक्षा वेगळा नसेल.

रोहितने 2015 विश्वचषकात मेलबर्नमधील उपांत्यपूर्व लढतीत 137 व 2019 मधील विश्वचषकात बर्मिंगहॅममध्ये 104 धावांचा झंझावात साकारत बांगला देशच्या जखमांवर बरेच मीठ चोळले आहे. सध्या विश्वचषक इतिहासात सर्वाधिक 8 शतकांचा विक्रम देखील रोहितच्या खात्यावरच नोंद आहे. त्या पार्श्वभूमीवर, बांगला देशचे गोलंदाज आणि रोहितची फलंदाजी यात आज आणखी एकदा जुगलबंदी अपेक्षित आहे.

पावसाचा व्यत्यय

सामन्याच्या पूर्वसंध्येला पुणे शहरात 5 मिनिटे वरुणराजाने हजेरी लावली व यामुळे सामन्यातही पावसाचा व्यत्यय येणार का? अशी साशंकता निर्माण झाली आहे.

जेव्हा सेहवागने 2011 मध्ये चुकता केला 2007 चा हिशेब!

आयसीसी विश्वचषकासारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत बांगला देशचा संघ उलटफेर करण्यात अगदी माहीर ठरत आला आहे. 2007 मधील विश्वचषक स्पर्धेत बांगला देशने भारताचा फडशा पाडला आणि याच पराभवामुळे भारतीय संघाचे स्पर्धेतील आव्हानच संपुष्टात आले होते. त्या स्पर्धेत भारतीय संघात सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली, वीरेंद्र सेहवाग, राहुल द्रविड, महेंद्रसिंग धोनी, युवराज सिंगसारख्या अव्वल खेळाडूंचा समावेश होता. पण, मुर्तझाचे 4 बळी आणि रझाक, रफिकच्या प्रत्येकी 3 बळींमुळे भारताचा डाव अवघ्या 191 धावांमध्येच गुंडाळला गेला होता. गांगुलीने 66 तर युवराजने 47 धावांची खेळी साकारली होती.

प्रत्युत्तरात तमिम इक्बाल, मुशफिकूर रहीम व शकीब हसनच्या अर्धशतकाच्या बळावर बांगला देशने 48.3 षटकातच विजयाचे लक्ष्य पार केले आणि भारताला मोठा झटका दिला होता. त्यानंतर 4 वर्षांच्या कालावधीनंतर बांगला देशचा संघ पुन्हा एकदा समोर उभा ठाकला, त्यावेळी 2007 मधील पराभवाच्या आठवणीमुळे चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला नाही तरच नवल होते. पण, यावेळी सेहवागने बांगला देशी गोलंदाजीचा आणि त्याचबरोबर त्यांच्या मनसुब्यांचा देखील अगदी पालापाचोळा केला होता.

सेहवागने 140 चेंडूंत 14 चौकार व 5 षटकारांसह 175 धावांची झुंजार खेळी साकारली. 2007 मधील जिव्हारी लागलेल्या त्या पराभवाचा जणू वचपाच काढत असावा, अशा थाटात सेहवाग मिरपूरमध्ये प्रत्येक बांगला देशी गोलंदाजाच्या हर-एक चेंडूवर तुटून पडत होता. विराटनेही 100 धावा फटकावल्या. भारताने त्या लढतीत 50 षटकांत 4 बाद 370 धावांचा डोंगर रचला तर बांगला देशला 9 बाद 283 धावांवर समाधान मानावे लागले होते. यानंतर 2015 व 2019 मध्येही दोन्ही संघ आमनेसामने भिडले आणि या दोन्ही वेळाही भारतानेच बाजी मारली आहे. यंदाही हीच परंपरा 'जैसे थे' राहण्याची तमाम भारतीय चाहत्यांची अपेक्षा असणार आहे.

खेळपट्टी आव्हानात्मक असणार आहे. आऊट फिल्ड लहान असल्यामुळे षटकार व चौकारांची आतषबाजी होऊ शकते. गोलंदाजांनासुध्दा या खेळपट्टीचा फायदा होऊ शकेल. त्यामुळे पूर्ण ताकदीनीशी आम्ही बांगलादेशविरुध्द मैदानावर उतणार आहोत. संघातील खेळाडूंनी आतापर्यंत झालेल्या तीन लढतींमध्ये ज्या प्रमाणे कामगिरी केली आहे तशीच कामगिरी करण्याचे लक्ष भारतीय संघातील खेळाडू ठेवतील. आमच्यासाठी या स्पर्धेतील प्रत्येक सामना जसा महत्त्वाचा आहे. तशीच उद्याची लढतसुध्दा तेवढीच महत्त्वाची असणार आहे.

– पारस म्हांब्रे, भारतीय संघाचे गोलंदाजी मार्गदर्शक

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT