Latest

हॉकीच्या रणांगणात ‘चक दे इंडिया’!

अमृता चौगुले

चेन्नई : वृत्तसंस्था : कर्णधार हरमनप्रीत सिंगने पेनल्टी कॉर्नरवर दोनवेळा गोलजाळ्याचा यशस्वी वेध घेतल्यानंतर भारताने आशियाई चॅम्पियन्स चषक हॉकी स्पर्धेत कट्टर, पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 4-0 असा एकतर्फी धुव्वा उडवला आणि स्पर्धेतील आपली अपराजित परंपरादेखील कायम राखली. स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील स्थान यापूर्वीच निश्चित केलेल्या भारतीय संघाने अतिशय आत्मविश्वासाने खेळ साकारत सामन्यात पूर्णवेळ एककलमी वर्चस्व गाजवले आणि यामुळे पाकिस्तानला सातत्याने बॅकफूटवरच राहावे लागले. या निकालासह पाकिस्तानचे स्पर्धेतील आव्हानदेखील संपुष्टात आले आहे.

या बहुचर्चित सामन्यात हरमनप्रीतने 15 मिनिटांच्या पहिल्या सत्रात पॉवरफुल लो फ्लिकवर गोलजाळ्याचा अचूक वेध घेत भारताला पहिले यश मिळवून दिले. पाकिस्तानचा गोलरक्षक अकमल हुसेनला यावेळी हा हल्ला थोपवण्यात किंचितही यश मिळाले नाही. भारताने नंतर 23 व्या मिनिटाला दुसरा पेनल्टी कॉर्नर मिळवला आणि यावेळीदेखील हरमनप्रीतने भेदक ड्रॅग फ्लिकवर दुसरा गोल नोंदवण्यात काहीच कसर सोडली नाही.

सातत्याने आक्रमणावर भर देत भारताने पाकिस्तानी संघावर कमालीचे दडपण राखले. 30 व्या मिनिटाच्या आसपास भारताला ठरावीक अंतराने सलग दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले. मात्र, या दोन्ही वेळा हरमनप्रीतला आणखी यश मिळाले नाही. यातील दुसर्‍या पेनल्टीवेळी भारताने पाकिस्तानच्या खेळाडूला पायाला चेंडू लागल्याने अपील केले होते. पण, व्हिडीओ रेफ्रींनी ते फेटाळून लावले. मध्यंतरावेळी भारतीय संघ 2-0 अशा फरकाने आघाडीवर राहिला.

तिसर्‍या सत्रात भारताने तिसरा पेनल्टी कॉर्नर मिळवला आणि यावेळी जुगराज सिंगने काहीही चूक न करता भारताची आघाडी 3-0 अशी भरभक्कम केली. पाकिस्तानला 43 व्या मिनिटाला पहिलावहिला पेनल्टी कॉर्नर जरुर मिळाला. पण, याचे त्यांना गोलमध्ये रुपांतर करण्यात अपयश आले. नंतर भारताने 55 व्या मिनिटाला चौथा गोल केला आणि 4-0 अशा एकतर्फी विजयावर शिक्कामोर्तब केले. आकाशदीप सिंगने यावेळी मनदीप सिंगच्या स्ट्राईकवर गोलजाळ्याचा अचूक वेध घेतला होता. भारताने या लढतीत एकूण पाच पेनल्टी कॉर्नर मिळवले आणि त्यापैकी तीन पेनल्टीचे गोलमध्ये रुपांतर केले.

असे झाले भारताचे गोल :

  • 15 व्या मिनिटाला हरमनप्रीतचा ड्रॅग फ्लिकवर गोल.
  • 23 व्या मिनिटाला हरमनप्रीतचे पेनल्टीवर सलग दुसरे यश.
  • 36 व्या मिनिटाला जुगराजचा पेनल्टीवर सांघिक तिसरा गोल.
  • 55 व्या मिनिटाला आकाशदीपचा मैदानी गोल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT