Latest

ठाणे : धुक्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने ; चाकरमान्यांना मनस्ताप

निलेश पोतदार

बदलापूर ; पंकज साताळकर काही दिवसांपासून कमी झालेल्या पाऱ्यामुळे सर्वत्र थंडी पसरली आहे. त्यातच आज (शनिवार) पहाटेपासून बदलापूर, वांगणी, नेरळ, कर्जत परिसरात धुक्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक अर्धा तास उशिराने धावत होती. धुक्यामुळे अस्पष्ट दिसत असल्यामुळे वाहतूक धिम्या गतीने सुरू असल्यामुळे मुंबईहून कर्जतकडे जाणाऱ्या व कर्जतहून मुंबईकडे येणाऱ्या गाड्या अर्धा तास उशिराने धावत होत्या. त्यामुळे चाकरमान्यांना याचा फटका सहन करावा लागला.

कर्जत, नेरळ, वांगणी, बदलापूर यासह कसारा ते कल्याण या भागातही धुके पसरल्यामुळे मध्य रेल्वेचे वाहतूक मंदावली होती. स्वाभाविकच मुंबईकडे परत येणाऱ्या गाड्यांनाही त्यामुळे उशीर होत होता. पहाटेपासूनच धुकं पसरल्यामुळे वाहतुकीवर याचा मोठा परिणाम झाला. सकाळी 8.30 नंतर धुकं कमी झाल्यानंतर वाहतूक सुरळीत सुरू झाली. मात्र दरम्यानच्या काळात वाहतूक उशिराने होत असल्यामुळे कल्याण ते कर्जत, खोपोली आणि कसारा मार्गावरील प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.

लोकल सुमारे २० ते २५ मिनीटांपर्यंत उशिराने धावत होत्या. त्यात उशिराने आलेल्या लोकलमध्ये दोन ते तीन लोकलच्या प्रवाशांची गर्दी होते होती. परिणामी उशिराने येणारी लोकल प्रवाशांच्या गर्दीने भरून जात होत्या. आधीच उशिरा आलेली लोकल आणि त्यात शिरण्यासही जागा मिळत नसल्याने दुसऱ्या लोकलची वाट पाहण्याशिवाय प्रवाशांकडे पर्याय नव्हता. दोन ते तीन लोकल सोडूनच प्रवाशांना प्रवास करावा लागल्याने स्वाभाविकच चाकरमान्यांना कार्यालय गाठण्यास उशीर झाला.

SCROLL FOR NEXT