Latest

ही आहे जगातील सर्वात मोठी ‘विमानांची ‘कब्रिस्तान’; 4000 हून अधिक विमाने आणि अवकाशयाने

अमृता चौगुले

अक्षय मंडलिक

तुम्ही जगातील सर्वात मोठ्या स्मशानभूमीबद्दल ऐकले असेल, जिथे लाखो लोक दफन केले जातात, परंतु तुम्ही कधी असे ऐकले आहे का? की विमानांची पण स्मशानभूमी असते. होय, अमेरिकेत अशी एक जागा आहे, जी जगातील लष्करी विमानांची सर्वात मोठी कब्रिस्तान म्हणून ओळखली जाते. चार हजारांहून अधिक निकामी झालेली लष्करी विमाने येथे ठेवण्यात आली आहेत. याशिवाय विमानांच्या या स्मशानभूमीत अनेक अवकाशयानेही ठेवण्यात आली आहेत.

विमानांची सर्वात मोठी स्मशानभूमी अॅरिझोनाच्या टक्सन वाळवंटात आहे, जी 2,600 एकरमध्ये पसरलेली आहे. ही जागा सुमारे 1400 फुटबॉल फील्डच्या बरोबरीची आहे. हे ठिकाण 'बोनयार्ड' म्हणून प्रसिद्ध आहे. 2010 मध्ये, Google Earth ने प्रथमच या ठिकाणाची स्पष्ट चित्रे प्रसिद्ध केली.

येथे ठेवलेली विमाने नवीन विमानांपासून ते दुसऱ्या महायुद्धात अमेरिकन सैन्याने वापरलेल्या विमानांपर्यंतची आहेत. या स्मशानभूमीत शीतयुद्ध काळातील बॉम्बर विमान बी-52 देखील ठेवण्यात आले आहे. अमेरिका आणि सोव्हिएत युनियन यांच्यातील SALT निःशस्त्रीकरण करारानंतर 1990 मध्ये अमेरिकेने B-52 विमाने त्यांच्या ताफ्यातून काढून टाकली होती. याशिवाय येथे F-14 विमाने देखील ठेवण्यात आली आहेत, ज्याला हॉलीवूडच्या प्रसिद्ध चित्रपट 'टॉप गन'मध्ये दाखवण्यात आले आहे. हे विमान 2006 मध्ये अमेरिकन सैन्यांनी आपल्या ताफ्यातून काढून टाकले होते.

अमेरिकेचा 309 वा एरोस्पेस मेंटेनन्स अँड रिजनरेशन ग्रुप या विमानांच्या कब्रिस्तानची देखभाल करतो. तसेच, यातील काही विमानांना उड्डाण करण्यायोग्य बनवतो. येथे जुन्या विमानाच्या इंजिनसह उर्वरित भाग जतन करून ते कमी किमतीत विकले जातात. अमेरिकन सरकारने इतर देशांनाही येथून जुने भाग आणि विमाने खरेदी करण्याची परवानगी दिली आहे.

SCROLL FOR NEXT