Latest

सीमोल्लंघनाचे नवे अर्थ

Arun Patil

दसर्‍याचे पौराणिक संदर्भ आणि देशभरातील प्रथा, परंपरा वेगवेगळ्या असल्या तरी त्या एका समान माळेत गुंफल्या आहेत. सत्प्रवृत्तींची दुष्टांवर मात करताना सत्याचा जयघोष हा त्यामागे सामावलेला मंगल अर्थ. हा धागा सांभाळताना आणि वृद्धिंगत करताना महाराष्ट्राने राजकीय, सामाजिक, अवकाशात दसर्‍याला आणखी वेगळे परिमाण दिले. 'दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा' ही महाराष्ट्राच्या दसर्‍याची टॅगलाईन लक्षात घेतली, तर त्याचे अनेक अर्थ समोर येऊ शकतील. विजयादशमीला सीमोल्लंघन करून आपट्याची पूजा करतात व त्याची पाने सोने म्हणून परस्परांना देतात.

ऐतिहासिक काळात या दिवशी सीमोल्लंघन करून लोक लढाईवर, मोहिमांवर जात. दसर्‍याचा सण साजरा करून शेतकरी लढाईसाठी बाहेर पडत, तेच सीमोल्लंघन. काळ बदलला. काळाचे संदर्भ बदलले. आज सीमोल्लंघन केवळ व्यक्तिगत आयुष्यापुरते मर्यादित राहिले नसून ते देशाच्या पातळीवरील व्यापक कृती म्हणूनही पाहिले जाते. तेच खर्‍या अर्थाने चौफेर प्रगतीच्या, विकासाच्या दिशेनेे सुरू असलेले सीमोल्लंघन. अलीकडच्या काळात भारताने केवळ जमिनीवर, पाण्यात आणि हवेत उड्डाणे मारून ते केलेले नाही तर त्यापलीकडे अवकाशात भरार्‍या घेतल्या. मंगळयान पूर्वीच झेपावले. यंदा चांद्रयान-3 मोहीम यशस्वी झाल्यानंतर सूर्याच्या दिशेने भारताने नवी झेप घेतली. पाठोपाठ अवकाशात स्थानक उभारण्याची तयारी सुरू केली. पृथ्वीच्या कक्षेच्या पलीकडचे हे सीमोल्लंघन प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटायला लावणारे आणि व्यक्तिगत आयुष्यातील सीमोल्लंघनासाठी प्रेरणा देणारे ठरले.

या आकांक्षांच्या नवचैतन्याने दाही दिशा उजळाव्यात आणि प्रत्येक भारतीयाच्या मनात नवप्रेरणांचे दीप तेवत राहावेत, हीच ती प्रेरणा. साहजिकच या पार्श्वभूमीवर येणारा दसरा सण प्रत्येकाच्या आयुष्यात नवी स्वप्ने घेऊन आला. सीमोल्लंघनाचे धार्मिक संदर्भ मागे पडून आधुनिक संदर्भ जोडले गेले. हा नवीनतेचा प्रवास सुरू असताना गरज आहे ती अज्ञानाकडून ज्ञानाकडे, अंधश्रद्धांच्या तसेच पारंपरिक रुढींच्या बेड्या तोडून वैज्ञानिक द़ृष्टिकोनाकडे, भ्रष्टाचाराकडून प्रामाणिकपणाकडे, असत्याकडून सत्याकडे, स्वराज्याकडून सुराज्याकडे सीमोल्लंघनाची. गणेशोत्सव आणि दहीहंडीच्या जल्लोषानंतर पाठोपाठ आलेला दसरा आणि तोंडावर आलेली दिवाळी यामुळे सगळीकडे उत्सवी जल्लोषाचे वातावरण आहे. निसर्गाने भरभरून दिलेले दान ओंजळीत घेऊन हा सण साजरा केला जातो आहे. आपला देश कृषिप्रधान. स्वाभाविकच या देशाचा आनंद हा शेतात डोलणार्‍या पिकांवर अवलंबून असतो.

प्रदेश कुठलाही असला, तरी शेतात डोलणारी पिके हेच त्यांचे वैभव आणि शेतीत कष्टाने पीकवलेल्या मोत्यांची रास भरल्या समाधानाने घरात आणण्याइतका आनंदाचा सण दुसरा कुठला? हा सण नेमका अशा आनंदाच्या भरतीमध्ये येतो. पावसाळा संपत आलेला असतो. पिकांची कापणी झालेली असते. धान्याच्या राशी घरात आलेल्या असतात किंवा खळ्यावर असतात. या दौलतीने शेतकर्‍याचे घर आनंदाने नाचत असते. कृषी संस्कृतीशी असलेला हा संदर्भ लक्षात घेऊनच दाराला तोरण म्हणून भाताच्या लोंब्या तोडून त्या फुलांसह बांधल्या जातात. असा हा उत्सव साजरा करताना यंदा महाराष्ट्रासह देशाच्या काही भागांत दुष्काळाचे सावट आहे. नजीकच्या काही महिन्यांत या टंचाईच्या सावल्या गडद होत जातील, याचेही भान ठेवावे लागेल. अर्थात नैसर्गिक संकटांशी झुंजण्याचे बळही या कृषी संस्कृतीत दडले आहे.

सणावारांचे पारंपरिक संदर्भ जोपासतानाच त्याला आधुनिक काळाशी जोडून घेण्यामुळे संस्कृती प्रवाही राहू शकते आणि संस्कृती प्रवाही ठेवायची असेल, तर पारंपरिक सीमोल्लंघनाला अनेक कल्पनांचे पंख लावून दशदिशांतून भरारीसाठी सज्ज व्हायला हवे. संस्कृतीच्या जपणुकीबरोबर त्याच संस्कृतीमधील सकस मूल्ये घेऊन भविष्याकडे वाटचाल त्यामुळेच सुकर होईल. आज दसरा म्हणजे विजयादशमीच्या निमित्ताने त्याद़ृष्टीने पावले टाकण्याची गरज आहे. पौराणिक काळात या दिवसाचे अनेक संदर्भ आहेत आणि ते घेऊन आधुनिक काळातही अनेक उपक्रमांचे आयोजन केले जाते. प्रभू रामचंद्रांनी आजच्याच दिवशी रावणाचा वध केला, म्हणून देशभरात ठिकठिकाणी रावण दहन केले जाते. हा रामायणकालीन संदर्भ.

महाभारतकालीन संदर्भ म्हणजे याच दिवशी पांडवांनी आपली शस्त्रे शमीच्या झाडाच्या ढोलीतून बाहेर काढली आणि ते युद्धासाठी, सीमोल्लंघनासाठी सज्ज झाले. म्हणून विजयादशमीला शस्त्रांची पूजा करण्याची प्रथा सुरू झाली. सीमोल्लंघनाशिवाय आयुष्यात प्रगती नाही, त्यामुळे प्रत्येक माणसाच्या आयुष्यात त्या दिशेने झेप जशी महत्त्वाची, त्यासाठीचा संकल्पही त्याहून अधिक! देशातील ऐंशी टक्के जनतेला रोजच्या जगण्याशी संघर्ष करावा लागतो. जगण्याच्या या कुरुक्षेत्रावर सामान्य माणूस प्रत्येक लढाई जिंकतोच असे नाही. अनेकदा त्याला हारही मानावी लागते. ही हार व्यवस्थेपुढे असते. व्यवस्थेतील भ्रष्टाचार, अनाचार, अनिष्ट प्रथा यांच्यापुढे असते. अनेकदा सामान्यातली सामान्य माणसेही या व्यवस्थेवर मात करून मोठ्या निर्धाराने पुढे जात असतात, त्यातून अनेकांना प्रेरणा मिळत असते. व्यवस्थेवर मात करून केले जाणारे सीमोल्लंघन सामान्य माणसांच्या जगण्याला हत्तीचे बळ देत असते.

सणावारांच्या निमित्ताने समाजजीवनाला एकत्रित ठेवण्यासाठी केले जाणारे प्रयत्नही तितकेच मोलाचे असतात. एकीकडे समाजमाध्यमांवर आभासी दुनियेत हजारो, लाखो माणसांच्या गोतावळ्यात असलेला माणूस वास्तव जीवनात एकटा असू शकतो. त्याचे एकटेपण दूर करण्याचे कामही सणांच्या निमित्ताने होत असते. म्हणूनच वर्तमान काळातील सीमोल्लंघनाचा अर्थ पांडव काळातल्याप्रमाणे शस्त्र हाती घेऊन बाहेर पडण्याचा किंवा तेवढ्यापुरता मर्यादित नाही, तर समाजजीवनातील विस्कटलेल्या चौकटी पुन्हा सांधण्याचा, माणसांना माणसांच्या जवळ आणण्याचाही. म्हैसूरचा पारंपरिक शाही दसरा, कोल्हापूरचा संस्थाानकालीन दसरा, बंगालचा दुर्गोत्सव, उत्तर भारतातील रामलीलांनी हा उत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला जातो. पारंपरिक उत्साहाला मिळालेली आधुनिकतेची जोड या सणाचा आनंद द्विगुणित करीत असते. 'सोने घ्या-सोन्यासारखे राहा', हाच संदेश देत नात्यांचे बंध अधिक घट्ट करूया.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT