Latest

पंतप्रधान मोदी लिखित वंदे मातरम कवितेच्या सीडीचे प्रकाशन

अमृता चौगुले

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : जी-२० मधील भारताचे यश हे गृहपाठ करून कार्य तडीस नेण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गुणवैशिष्ट्याचे आहे, अशा शब्दात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे पदाधिकारी इंद्रेश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ७३ वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन केले. निमित्त होते पंतप्रधान नरेंद्र मोदी लिखित "वंदे मातरम्…अपनी शान" कवितेच्या संगीत सीडीच्या प्रकाशनाचे.

मदरलॅंड इंटरनॅशनल फाऊंडेशनतर्फे आज दिल्लीत झालेल्या कार्यक्रमामध्ये, मोदींच्या कवितेच्या सीडीचे प्रकाशन इंद्रेशकुमार यांच्या हस्ते झाले. आकाशवाणीच्या रंगभवन सभागृहात झालेल्या या कार्यक्रमामध्ये कवितेला चाल लावणारे संगीतकार संजय हांडे, मूळ गुजरातीमधून कवितेचा हिंदीत अनुवाद करणाऱ्या साहित्यिक डॉ. अंजना संधीर, मुस्लिम राष्ट्रीय मंचाचे राष्ट्रीय संयोजक डॉ. शाहिद अख्तर, मदरलॅंड इंटरनॅशनल फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. ए.के. अग्रवाल, आकाशवाणीचे मनोहरसिंह रावत, डॉ. इमरान चौधरी हे व्यासपिठावर होते.

पंतप्रधान मोदींच्या ७३ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून झालेल्या या कार्यक्रमामध्ये बोलताना इंद्रेशकुमार यांनी जी-२० परिषदेतील भारताचे यश विशद करताना त्याचे श्रेय पंतप्रधान मोदींना दिले. पंतप्रधानांनी मागील काही वर्षात परदेश दौरे केले होते आणि जागतिक नेत्यांशी संपर्क साधला होता त्यातून हे साध्य झाले. हा त्यांचा गृहपाठ होता. आपल्या अध्यक्षपदाच्या काळात जगाला कुठे न्यायचे आहे हे भारताने आधीच ठरविले होते. एमेरिएट्स महासंघ, युरोपीय महासंघ आहे, आफ्रिकी महासंघ याप्रमाणेआपल्यालाही भारतीय महासंघ बघण्याची संधी मिळू शकते, असा आशावाद इंद्रेशकुमार यांनी व्यक्त केला.

उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्मावर केलेल्या वक्तव्यानंतर उद्भवलेल्या वादावरही सूचक भाष्य इंद्रेशकुमार यांनी केले. ते म्हणाले की मच्छर, कोड, डेंग्यू यासारखे अपशब्द आपल्याच कुटुंबियांबद्दल आपल्याच मित्रपक्षांबद्दल बोलले गेले आहेत. त्यात उद्धव ठाकरे, केजरीवाल, अखिलेश यादव लालूप्रसाद यादव किंवा राहुल गांधी यांच्यासारखे नेते असतील. या पक्षांनी जाब विचारायला हवा. सर्व धर्मांचा आदर या भारतीय संविधानातील विचारांचे मूळच भारतीय संस्कृतीमध्ये असताना महान संस्कृतिवर चिखलफेक करण्याचा अधिकार कोणी दिला. यावर प्रतिक्रिया उमटत नसेल तर आपण भारतीय आहोत की नाही हा प्रश्न उपस्थित होतो. अशी टिप्पणीही त्यांनी केली.
भारताने स्वतंत्रता संग्राम शस्त्रांनी नव्हे तर नैतिकतेने लढला.

आपल्या सीमांच्या रक्षणात भारत शस्त्रबळात कमी नाही आणि नैतिकबळातही कमी नाही. आज आपले या दोन्ही क्षेत्रात श्रेष्ठत्व असल्याचे सांगताना पाकव्याप्त काश्मीर भारताचा हिस्सा होता, आहे आणि राहील, असे सूचक विधान इंद्रेशकुमार यांनी केले. १४ नोव्हेंबर १९६२ मध्ये लोकसभा आणि राज्यसभेचे संयुक्त अधिवेशन झाले होते. त्यात चीनने बळकावलेली एक एक इंच भूमी मोकळी करण्याचा ठराव मंजूर झाला याची आठवणही त्यांनी करून दिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT