Latest

शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार : दीपक केसरकर

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : राज्यातील सर्व शाळांत सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार असल्याचे शिक्षणमंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सोमवारी सांगितले. शिक्षकांच्या बदल्या आता होणार नाहीत. यामुळे शिक्षकांनी आपल्या शाळांची जबाबदारी घेऊन त्या विकसित कराव्यात, असे आवाहनही त्यांनी केले. शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषदेत बोलताना केसरकर म्हणाले, शिक्षक शाळेत

वेळेवर येतात का, वर्गात किती शिकवतात, कोणते उपक्रम राबविले जातात, विद्यार्थ्यांचा त्याला कसा प्रतिसाद मिळतो, विद्यार्थी शिकवलेले ग्रहण करतात की नाही हे पाहिले जाईल, याकरिता प्रत्येक शाळेत सीसीटीव्ही बसवले जातील.

राज्यात पहिल्या टप्यात 30 हजार तर दुसर्‍या टप्प्यात 20 हजार अशा 50 हजार शिक्षकांची भरती होणार आहे. यामुळे शिक्षकांचा तुटवडा भासणार नाही, असे सांगत केसरकर म्हणाले, केंद्र प्रमुखाच्या 70 टक्के रिक्त जागा भरल्या जातील. शिक्षक भरतीसाठी सध्या न्यायालयीन स्थगिती आहे, त्यामुळे तात्पुरती व्यवस्था केली जाईल. सुमारे दोन लाखांपेक्षा जास्त जणांनी शिक्षक भरतीसाठी परीक्षा दिली आहे. जे परीक्षा पास होऊ शकले नाही, अशांना कायमस्वरूपी नोकरीत सामावून घेता येणे शक्य नाही, असेही त्यांनी सांगितले.

गणवेश खरेदीसाठी निधी दिला आहे. गणवेश देण्याची जबाबदारी शाळा स्तरावरच आहे. गणवेश नाही म्हणून शाळा थांबली असे काही झालेले नाही. गणवेशाचा प्रश्न केवळ पहिलीच्या विद्यार्थ्यांना आला आहे, असे सांगत केसरकर म्हणाले, मुले आता एकच पुस्तक घेऊन शाळेत जात आहेत. सरकारी शाळेत आता एकसारखाच गणवेश दिसणार आहे. स्काऊट आणि गाईड तसेच शाळांचा गणवेश सारखाच असेल.

शाळांना टप्प्याटप्प्याने अनुदान दिले. विद्यार्थी शिष्यवृत्तीत वाढ केली. ग्रंथपालांचे मानधन वाढवले. तासिका तत्त्वावरील शिक्षकांच्या मानधनात वाढ केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

SCROLL FOR NEXT