Latest

cash for query case | ‘कॅश फॉर क्वेरी’ प्रकरणी CBI कडून महुआ मोईत्रांच्या घरी झाडाझडती

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोईत्रा यांच्या निवासस्थानासह कोलकाता येथील इतर काही ठिकाणी सीबीआयने झाडाझडती सुरु केली आहे. 'कॅश फॉर क्वेरी' प्रकरणाशी संबंधित ही कारवाई करण्यात येत आहे. (cash for query case) महुआ मोईत्रा यांच्या विरुद्ध एफआयआर नोंदवल्यानंतर काही दिवसांनी ही कारवाई करण्यात आली आहे. भाजपचे लोकसभा सदस्य निशिकांत दुबे यांनी मोईत्रा यांच्यावर केलेल्या आरोप प्रकरणी सीबीआयचा प्राथमिक चौकशीचा अहवाल मिळाल्यानंतर लोकपालच्या निर्देशानुसार एफआयआर नोंदवण्यात आले आहे.

कॅश फोर क्वेरी प्रकरणी महुआ मोईत्रांना संसदेतून निलंबित करण्यात आले होते. ८ डिसेंबर २०२३ रोजी त्यांचे संसद सदस्यत्व रद्द करण्यात आले होते.

महुआ मोईत्रा यांनी उद्योगपती हिरानंदानींकडून पैसे आणि भेटवस्तू घेऊन संसदेत प्रश्न विचारल्याचा आरोप होता. या प्रकरणात भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे केलेल्या तक्रारीनंतर नैतिक आचरण समितीने या प्रकरणाची चौकशी केली होती. तर उद्योगपती हिरानंदानी यांनीही या प्रकरणात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये महुआ मोईत्रांनी संसदेचा लॉगीन आयडी आणि पासवर्डदेखील आपल्याकडे सोपविल्याचे म्हटले होते. नैतिक आचरण समितीला महुआ मोईत्रांवरील आरोप खरे आढळले होते. एवढेच नव्हे तर बंगळूर, दुबई, अमेरिका येथून महुआ मोईत्रांचे संसदेचे खाते वापरण्यात आल्याचेही आढळल्याच्या पार्श्वभूमीवर, हा संसदेच्या सुरक्षेशी निगडीत विषय असल्याने त्यांची खासदारकी रद्द करावी, अशी शिफारस समितीने केली होती.

समितीचा अहवाल मागील गेल्या८ डिसेंबर रोजी लोकसभेत आवाजी मतदानाने संमत करण्यात आला होता. खासदार महुआ मोईत्रा यांचे वर्तन अनैतिक आणि अशोभनीय होते, हा समितीचा निष्कर्ष हे सभागृह मान्य करते, असे अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले होते. त्यानंतर मोईत्रा यांची लोकसभेतून हकालपट्टी करण्यात आली होती.

हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT