Latest

प्रजनन अक्षमतेची कारणे काय? ‘हे’ नियम स्वत:च पाळा

दिनेश चोरगे

आधुनिकीकरणामुळे महिलांच्या जीवनशैलीतही खूप बदल झालेला दिसून येतो. या बदलत्या जीवनशैलीमुळे आजच्या स्त्रियांमध्ये मोठ्या प्रमाणात इनफर्टीलिटी वाढलेली दिसून येते. इनफर्टीलिटी म्हणजे प्रजनन अक्षमता होय. स्त्रियांमध्ये प्रजनन अक्षमता वाढण्यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे करिअर सांभाळण्याच्या या चक्रामध्ये त्यांचं आहाराकडे साफ दुर्लक्ष होत आहे. करिअरच्या मागे लागल्यामुळे विवाहाचे वयही पुढे जात आहे. लग्न केल्यानंतरही त्यांना लवकर त्यांना मूल नको असते; मात्र गर्भधारणा टाळताना वय वाढत आहे, याकडे त्या लक्षच देत नाही. तसेच फास्टफूड, जंकफूड यांच्या नादात पौष्टिक आहार पोटात न गेल्यामुळेही प्रजनन क्षमता घटते.

सध्याची तणावग्रस्त जीवनशैलीही याला बर्‍याच प्रमाणात कारणीभूत ठरते. चाळीसाव्या वर्षापासून स्त्रियांमधील गर्भाशयातील बिजांडे नष्ट व्हायला सुरुवात होऊ लागते. त्यामुळे गर्भाचे निर्माण करणारे जीवशास्त्रीय घड्याळे गर्भ निर्माण करण्याचे थांबवते. स्त्री 35 वर्षांची होते तेव्हा 55 टक्के बिजांडे वेगाने नष्ट व्हायला सुरुवात होते. जसजसे वय वाढत जाते तसतसे केवळ गर्भधारणेची क्षमताच नाही, तर इतरही कारणांमुळे गर्भधारणा होण्याची शक्यता कमी होऊ लागते. 20 ते 35 वर्षांपर्यंतचे वय गर्भधारणेसाठी सर्वात उत्तम असते. या काळात गर्भधारणा झाली नाही, तर हळूहळू ओव्हरिजची कार्यक्षमता कमी होऊ लागते. बिजांडे कमी प्रमाणात तयार होतात तसेच त्यांची गुणवत्ताही चांगली राहत नाही.

गर्भधारणा न होण्याचे आणखी एक कारण म्हणजे पीसीओडी म्हणजे पोलिसिस्टिक ओवेरियन डिसीस. हा एक हार्मोन्स असंतुलनामुळे निर्माण होणारा आजार आहे. 16 – 17 वर्षांच्या मुलींना अनियमित मासिक पाळी असणे किंवा काहींची पाळी नियमित असेल; पण वजन खूप वाढू लागणे, चेहर्‍यावर, शरीरावर अनावश्यक केस येऊ लागतात. खूप जास्त तारुण्यपिटीका येतात इत्यादी लक्षणे असली म्हणजे हार्मोन्सचे असंतुलन आहे असे समजावे. जवळपास 25 टक्के महिलांमध्ये ही समस्या दिसून येते. पोलिसिस्टिक ओव्हरिज सिंड्रोममुळे प्रत्येक महिन्यात बिजांडे बाहेर पडत नाही. त्यामुळे प्रजननाची शक्यता कमी होते. बरेचदा पेल्व्हीक इन्फेक्शन होऊन बिजांडे वाहून नेणारी फेलोवियन ट्यूब बंद होते. त्यामुळेही गर्भधारणा होत नाही. तसेच टीबी हेसुद्धा इनफर्टीलिटीचे एक कारण आहे.

आजकाल शहरी भागातील अनेक तरुणी-महिलांना दारू, सिगारेट, तंबाखू यासारख्या व्यसनांनी ग्रासलेले आहे. यांच्या सेवनाचा दुष्परिणाम बिजांडावर होतो. अशा प्रकारच्या व्यसनांच्या अतिप्रमाणामुळे पुरुषांच्या शुक्राणूंवरही परिणाम होतो. एका आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणानुसार सिगारेट पिणार्‍या पुरुषांच्या शुक्राणूंच्या संख्येत 15 टक्के घट होते, असे दिसून आले आहे. हल्ली मुली आणि स्त्रियाही मोठ्या प्रमाणात सिगारेट आणि दारू पितात. शहरांमध्ये तर ही एक फॅशन बनली आहे; मात्र यामुळे गर्भधारणेमध्ये अडथळे निर्माण होतात आणि गर्भपाताच्या शक्यता वाढतात. या सवयीमुळे प्री मॅच्युअर म्हणजे मुदतीपूर्व प्रसूतीची शक्यताही वाढते. पोलिसिस्टिक ओव्हरिज सिंड्रोम असणार्‍या आणि त्यांचबरोबर धूम्रपानाची सवय असणार्‍या स्त्रियांमध्ये परिस्थिती आणखी बिघडते.

याखेरीज मानसिक तणाव, डिप्रेशन इत्यादींमध्ये देण्यात येणारी औषधे हार्मोन्समध्ये असंतुलन निर्माण करतात. अतिशय तणावग्रस्त किंवा अस्थमासारख्या आजारांनी पीडित असणार्‍या स्त्री-पुरुषांना सतत संबंधित औषधे घ्यावी लागतात. पाहणीनुसार असे आढळून आले आहे की, अँटिहायपरटेंसिव्ह औषधे घेतल्यामुळे स्त्री-पुरुष दोघांची प्रजनन क्षमता घटते.

हल्ली धूळ, धूर, गॅस, रासायनिक पदार्थ, मोबाईल, आवाज याद्वारे वेगवेगळ्या प्रकारचे प्रदूषण सतत वाढतच आहे. गेल्या 50 वर्षांत प्रदूषणामुळे पुरुषांच्या शुक्राणूंची संख्या 50 टक्क्यांनी घटल्याचे सर्वेक्षण मध्यंतरी प्रसिद्ध झाले होतेे. प्रदूषण कोणत्या ना कोणत्या मार्गे स्त्री बिजांडांवर आणि शुक्राणूंवर परिणाम करत असतात. लॅपटॉप आणि मोबाईल जास्त वापरल्यामुळेही पुरुषांमध्ये इनफर्टीलिटी येत असेल, तर स्त्रियांवरही याचा नक्कीच प्रभाव पडणारच. अशा हायटेक साधनांच्या वापरामुळे आणि प्रदूषणामुळे शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण घटत असते. याचा परिणाम साहजिकच प्रजनन क्षमतेवर होतो. बहुतेक महिला साधारण 32-35 वर्षे वयात डॉक्टरांकडे उपचारांसाठी जातात. परंतु, स्त्रियांसाठी 22 ते 34 वर्षांपर्यंतचा काळ गर्भधारणेसाठी सर्वाधिक चांगला मानला जातो. पुरुषांसाठीही हाच काळ उत्तम असतो. त्यामुळे याच वयात मुलांना जन्म देणे आरोग्याच्या द़ृष्टीने योग्य असते. अशा अनेक कारणांमुळे महिलांमधील इनफर्टीलिटीचे प्रमाण वाढत आहे.

हे टाळण्यासाठी काही नियम स्वत:च पाळावेत.

  • निसर्गनियमानुसार योग्य वेळेत गर्भधारणा होणे आवश्यक आहे.
  • खाण्यापिण्याकडे लक्ष द्यावे, स्थूलपणा नियंत्रित ठेवावा. त्यामुळे पीसीओेडीची तक्रार राहणार नाही.
  • पती-पत्नीचं आयुष्य समाधानाचं आणि तणावविरहित असावं.
  • तुम्हाला पोलिसिस्टिक ओवेरियन डिसीज आहे आणि सहा महिन्यांपर्यंत प्रयत्न करूनही गर्भधारणा होत नसेल, तर डॉक्टरांना जरुर भेटावे.
  • आपल्या सहचरासोबत प्रामाणिक राहावे. अनैतिक संबंध ठेवू नयेत. यातून गुप्तरोगांची शक्यता वाढते आणि प्रजनन क्षमता कमी होते.
  • आपल्या मासिक पाळीच्या चक्राबद्दल डॉक्टरांकडून माहिती घ्यावी. नेमके कोणत्या दिवशी बिजांडे बाहेर पडते ते जाणून घ्यावे व त्यानुसार गर्भधारणेसाठी प्रयत्न करावेत, म्हणजे गर्भ राहण्याची शक्यता वाढते.
  • जीवनशैली खरोखरच खूप वेगवान झाली आहे; पण जीवनाचे काही सुंदर पैलूही आहेत. त्याकडे दुर्लक्ष करू नये. जीवनातील या सुरेख आनंदाचा आस्वाद घ्यायचा असेल, तर शरीराच्या घड्याळाकडे नक्कीच लक्ष द्यावे लागेल.
SCROLL FOR NEXT