Latest

कॅश फॉर क्वेरी प्रकरण : खासदार महुआ मोईत्रा आज संसदीय समितीसमोर बाजू मांडणार

मोहन कारंडे

नवी दिल्ली: पुढारी वृत्तसेवा : तृणमूल खासदार महुआ मोईत्रा गुरुवारी (दि. २) कॅश फॉर क्वेरी प्रकरणी लोकसभेच्या नैतिक आचरण समितीपुढे आपली बाजू मांडणार आहेत. संसदीय समितीसमोर प्रतिज्ञापत्र देणारे जय अनंत देहादराय यांची उलटतपासणी घेण्याची परवानगी महुआ मोईत्रा यांनी मागितली आहे.

दरम्यान, अॅपल कंपनीकडून आलेल्या इशाऱ्यानंतर विरोधकांवर सरकार पाळत ठेवत असल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर महुआ मोईत्रा यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून खासदारांच्या अधिकारांची जपणूक करण्याची मागणीही केली आहे.
खासदार महुआ मोईत्रा यांच्यावर आरोप करणारे भाजप खासदार निशिकांत दुबे यांची बाजू लोकसभेच्या नैतिक आचरण समितीने ऐकून घेतली होती. पाठोपाठ, महुआ मोईत्रा यांनी प्रश्न विचारण्यासाठी लॉगीन, पासवर्ड दिल्याचे प्रतिज्ञापत्र सादर करणारे उद्योजक दर्शन हिरानंदानी यांनीही समितीसमोर आपली बाजू मांडली होती. त्यानंतर समितीने महुआ मोईत्रांना हजर राहण्यास सांगितले होते. उद्या महुआ मोईत्रा यांना हजर राहावे लागणार आहे.

हॅकिंगच्या मुद्दयावर बिर्ला यांना पत्र

दुसरीकडे, महुआ मोईत्रा यांनी फोन हॅकिंगच्या मुद्दयावरून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून खासदारांच्या हक्कांची जपणूक करण्यासाठी हस्तक्षेपाची मागणी केली केली. अॅपल कंपनीने राजकीय नेत्यांना त्यांच्या मोबाईलमध्ये सरकारपुरस्कृत घुसखोरी सुरू असल्याचा इशारा देणारा संदेश पाठविला होता. त्यावरून विरोधकांनी सरकारला लक्ष्य केले होते; तर खासदार महुआ मोईत्रा यांनी यानिमित्ताने पंतप्रधान कार्यालय आणि गृह मंत्रालयावर कडाडून टीका केली होती. पाठोपाठ आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात मोईत्रा यांनी खासदारांना लोकसभा अध्यक्षांनी संरक्षण द्यावे, असे आवाहन केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT