Latest

महंत नरेंद्र गिरी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या खोलीत सापडली 3 कोटींची रक्कम, 50 किलो सोने आणि जमिनीची कागदपत्रे

अमृता चौगुले

पुढारी ऑनलाईन: आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांच्या निधनानंतर त्यांची सील असलेली खोली वर्षभरानंतर उघडण्यात आली आहे. महंत नरेंद्र गिरी यांच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी करणारे सीबीआयचे पथक १५ सप्टेंबरला प्रयागराजला पोहोचले. जवळपास वर्षभरापासून सील असलेली महंत नरेंद्र गिरी यांची खोली उघडण्यासाठी सीबीआयचे पथक बाघम्बरी मठात आले होते. सीबीआयच्या पथकाने पोलीस आणि न्यायदंडाधिकारी यांच्या उपस्थितीत महंत नरेंद्र गिरी यांची खोली उघडली. यावेळी खोलीचे कुलूप उघडले असता खोलीचे फोटो व व्हिडिओग्राफीही करण्यात आली. यासोबतच खोलीत सापडलेल्या वस्तूंची यादीही तयार करण्यात आली असून त्यात मठ बाघम्बरी गादी संबंधित अनेक महत्त्वाची कागदपत्रे आणि मौल्यवान वस्तूही सापडल्या आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, महंतांच्या खोलीतून 3 कोटी रुपये रोख, 50 किलो सोने आणि काही जमिनीची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.

रोख रक्कम आणि तूप

महंतांच्या खोलीतून रोख रक्कम आणि जमिनीच्या कागदपत्रांव्यतिरिक्त कोट्यवधींचे दागिने आणि सुमारे 9 क्विंटल देशी तूप सापडल्याचे सांगण्यात आले आहे. महंतांच्या खोलीतून सापडलेल्या वस्तू महंत बलवीर गिरी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या आहेत. मात्र, याप्रकरणी कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

मठाच्या मुख्य गेटजवळ असलेल्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर महंत नरेंद्र गिरी यांची खोली आहे. महंताच्या संशयास्पद मृत्यूनंतर प्रयागराज पोलिसांनी मठातील दोन खोल्या सील केल्या होत्या. एक खोली ज्यामध्ये महंत नरेंद्र गिरी यांचा मृतदेह सापडला होता आणि दुसरी खोली, ज्यामध्ये महंत नरेंद्र गिरी राहत होते. महंत नरेंद्र गिरी राहत असलेली खोली १५ सप्टेंबर रोजी उघडण्यात आली. महंत नरेंद्र गिरी यांचा मृतदेह ज्या खोलीत सापडला ती खोली अद्याप उघडलेली नाही.

न्यायालयात केली होती याचिका

वृत्तानुसार, बाघम्बरी मठाचे विद्यमान महंत बलवीर गिरी यांनी खोली उघडण्यासाठी न्यायालयात अर्ज केला होता. न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआयच्या पथकाने पोलीस आणि न्यायदंडाधिकारी यांच्या उपस्थितीत खोली उघडली. खोलीतून सापडलेल्या प्रत्येक वस्तूची नोंद तयार करण्यात आली. यासोबतच व्हिडीओग्राफी आणि फोटोग्राफीही करण्यात आली. दंडाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा कक्ष मठाचे विद्यमान महंत बलवीर गिरी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

मठातील महंत नरेंद्र गिरी यांची खोली उघडण्यासाठी सीबीआय आणि पोलिस प्रशासनाचे पथक दुपारी दोनच्या सुमारास पोहोचले होते. यावेळी मठाचे सर्व दरवाजे आतून बंद करण्यात आले. कोणालाही आत येऊ दिले नाही. प्रसारमाध्यमांनाही केवळ एका भागापुरते मर्यादित ठेवण्यात आले होते आणि वरच्या मजल्यावर जिथे खोली उघडली जात होती तिथे जाण्याची परवानगी नव्हती. 20 सप्टेंबर 2021 रोजी महंत नरेंद्र गिरी यांचा मृतदेह मठाच्या एका खोलीत सापडला होता. तेथून एक सुसाईड नोटही जप्त करण्यात आली आहे. चिठ्ठीत आनंद गिरी, आराध्या तिवारी आणि संदीप तिवारी यांच्यावर मानसिक छळ केल्याचा आरोप आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT