Latest

आवारे खून प्रकरणी आमदार सुनील शेळकेंसह सात जणांवर गुन्हा ; राजकीय वर्तुळात खळबळ

अमृता चौगुले

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्या खून प्रकरणी मावळचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी (दि. १२) दुपारी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेसमोर घडली. याप्रकरणी किशोर आवारे यांच्या आई, तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा सुलोचना आवारे यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, आमदार सुनील शेळके, सुधाकर शेळके, संदीप गराडे, श्याम निगडकर (रा. तळेगाव दाभाडे) यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किशोर आवारे जनसेवा विकास समितीच्या माध्यमातून राजकारणात सक्रीय होते. त्यामुळे त्यांचे राजकीय विरोधक असलेले आमदार सुनील शेळके, सुधाकर शेळके, संदीप गराडे आणि त्यांच्यात वाद सुरू होते. दरम्यान, मागील सहा महिन्यांपासून किशोर यांनी आमदार शेळके, त्यांचे भाऊ सुधाकर शेळके, संदीप गराडे यांच्यापासून आपल्या जीवाला धोका असल्याचे आईला सांगितले होते.

किशोर हे संतोष शेळके यांच्यासोबत फिरत असल्याची बाब सुनील शेळके आणि त्यांच्या भावाला आवडत नव्हती. किशोर यांनी मागील दोन वर्षांपासून स्वताचा वेगळा गट तयार करून सुनील शेळके यांना राजकीय विरोध केला. चुकीच्या कामाबाबत वेळोवेळी निदर्शने केली. या रागातून तसेच त्यांचे राजकीय वर्चस्व वाढू लागल्याने आमदार शेळके यांच्या वर्चस्वाला धोका निर्माण झाला होता. त्यामुळे शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास किशोर नगरपरिषद कार्यालयात गेले असता तेथे आरोपी श्याम निगडकर आणि त्याच्या तीन अनोळखी साथीदारांनी बंदुकीच्या गोळ्या झाडून व कोयत्यासारख्या धारदार शस्त्राने वार करून ठार मारल्याचे फिर्यादीत नमूद आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

SCROLL FOR NEXT