मुंबई; पुढारी वृत्तसेवा : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बंद दाराआड अर्धा तास चर्चा झाली. त्यानंतर मुख्यमंत्री आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यात पाऊण तास खलबते झाली.
विशेष म्हणजे या दोन्ही बैठकांवेळी अधिकारी, सुरक्षारक्षकांना बाहेर जाण्यास सांगण्यात आले. शिवाय बोलावल्याशिवाय कोणालाही आत पाठवायचे नाही, अशी तंबीही कर्मचार्यांना बजावण्यात आली होती. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीसाठी शिंदे गटातील दोन मंत्री तसेच पाच ते सहा आमदार तब्बल दीड तास बाहेर ताटकळत उभे होते. आधी फडणवीस आणि नंतर महाजनांशी चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्री बाहेर आले, नेहमीप्रमाणे उपस्थितांची निवेदने घेतली. मात्र ते तडक मंत्रालयातून वर्षा निवासस्थानी रवाना झाले. त्यामुळे बंद दाराआड नेमकी कसली खलबते झाली, याची चर्चा मंत्रालयात रंगली होती.