Latest

बारामती शहरात घरफोडी साडे तीन लाखांचा ऐवज चोरीला

अमृता चौगुले

बारामती : पुढारी वृत्तसेवा :  शहरातील अशोकनगर भागात बंगल्याच्या खिडकीचे ग्रील तोडून आतमध्ये प्रवेश करत अज्ञात चोरट्यांनी सव्वा तीन लाखांचे दागिने व घड्याळ, सात हजाराची रोख रक्कम असा ३ लाख ३४ हजारांचा माल लंपास केला. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अशोक बबनराव गलांडे यांनी फिर्याद दिली. रविवारी (दि. ९) मध्यरात्री फिर्यादीच्या श्रद्धा बंगल्यात ही घटना घडली.

शनिवारी (दि. ८) गलांडे कुटुंब जेवणखाण करून झोपले. पहाटे ते उठले असताना बेडरुमचा दरवाजा बाहेरून बंद होता. त्यांनी प्रयत्न करूनही दरवाजा उघडला नाही. यावेळी फिर्यादी यांचा नातू अर्णव हा घराबाहेर गेला. त्याने पाहिले असता खिडकीचे ग्रील एका बाजूने काढलेले दिसले. बेडरुमच्या दोन्ही लोखंडी कपाटातील कपडे, सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. कपाट व लाॅकरची पाहणी केली असता त्यातील ऐवज चोरीला गेल्याचे दिसून आले.

या घटनेत १ लाख २५ हजार रुपयांचे साडे तीन तोळ्यांचे गंठण, ५० हजार रुपयांचे दीड तोळ्याचे मिनी गंठण, ३५ हजार रुपयांची अंगठी, १७ हजार रुपयांच्या लेडीज अंगठी, १८ हजार रुपयांचे टाॅप्स, ४० हजार रुपयांचा चांदीचा गणपती, ८ हजार रुपयांचा छोटा गणपती, पाच हजार रुपयांचा चांदीचा पेला, २ हजारांचे चांदीचे ब्रेसलेट, ३ हजारांच्या चांदीच्या साखळ्या, ५ हजार रुपयांची चांदीची अत्तरदाणी, २ हजार रुपयांचे करंडे, ७ हजार रुपयांचे चांदीचे दागिने, ३ हजार रुपयांचे पैंजण, २ हजार रुपयांच्या वाट्या, चार हजार रुपयांची चांदीची नाणी, एक हजारांचे घड्याळ व सात हजारांची रोख रक्कम चोरीला गेल्याचे दिसून आले.

SCROLL FOR NEXT