पुणे : 'कोविड-19 च्या साथीची सर्वांत जास्त झळ वृद्धांना सोसावी लागली. त्यामुळे जगभरातील सरकारे, संस्था आणि समाज यांचा वृद्धांकडे बघण्याच्या दृष्टिकोनात बदल झाला आहे. याबाबतची माहिती 'ब्रिज द गॅप : अंडरस्टँडिंग एल्डर नीड्स' या हेल्पएज इंडियाच्या राष्ट्रीय अहवालातून समोर आली आहे. हेल्पएज इंडियाचे महाराष्ट्र आणि गोवा क्षेत्राचे प्रमुख प्रकाश एन. बोरगावकर यांच्या उपस्थितीत 'जागतिक ज्येष्ठ नागरिक छळ व प्रतिबंध जनजागृती दिना'च्या पूर्वसंध्येला मंगळवारी हा राष्ट्रीय अहवाल प्रसिद्ध करण्यात आला.
मुंबईतील 42 टक्के वृद्धांचे उत्पन्न जगण्यासाठी अपुरे असून, वृद्धापकाळासाठी आर्थिक नियोजन आणि सामाजिक सुरक्षेकडे अधिक लक्ष देण्याची गरज असल्याची माहिती सर्वेक्षणातून पुढे आली आहे. 'भारतात सुमारे 93 कोटी 80 लाख वृद्ध नागरिक आहेत. त्यांची संख्या लोकसंख्येच्या 10 टक्के इतकी भरते. म्हणूनच आम्ही 'ब्रिजिंग द गॅप' ही या वर्षीची संकल्पना ठरवली आहे,' असे बोरगावकर यांनी सांगितले.
भारतातील 22 शहरांमधील ए. बी. सी. श्रेणीतील 4, 399 वृद्ध प्रतिसादक आणि 2,200 तरुण प्रौढ काळजीवाहक अशा नमुना आकारावर आधारित हे सर्वेक्षण करण्यात आले आहे. राष्ट्रीयस्तरावर 47 टक्के ज्येष्ठ नागरिक हे उत्पन्नाच्या स्रोतासाठी आपल्या कुटुंबावर अवलंबून आहेत. दरमहा 3 हजार रुपये निवृत्तिवेतन मिळावे. शहरी-गरीब, ग्रामीण वृद्धाकडे आधाराची कोणतीही व्यवस्था, पुरेसे उत्पन्न अथवा निवृत्तिवेतन नसते. अशा नागरिकांना दरमहा 3 हजार रुपये सार्वत्रिक निवृत्तिवेतन मिळावे, जेणेकरून प्रत्येक वृद्ध सन्मानाने जीवन जगू शकेल, अशी भूमिका 'हेल्पएज'तर्फे मांडण्यात येत आहे.
काय सांगते सर्वेक्षण
– 71 टक्के वृद्ध सध्या काही काम करीत नाहीत.
– 36 टक्के वृद्धांना काम करण्याची अजूनही इच्छा आहे.
– 34 टक्के ज्येष्ठ निवृत्तिवेतन, आर्थिक मदतीवर अवलंबून आहेत.
– निवृत्तीचे वय वाढवण्याची 29 टक्के ज्येष्ठांची मागणी.
– 30 टक्के जेष्ठ स्वयंस्फूर्तीने स्वयंसेवा करण्यास राजी.
– उतारवयात आरोग्य विमा नसल्याची 67 टक्के ज्येष्ठांना वाटते खंत.