Latest

आई-वडिलांच्‍या विरोधामुळे लग्‍नाचे वचन मोडणे ‘बलात्‍कार’ ठरत नाही : उच्‍च न्‍यायालय

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : आई-वडिलांची नात्‍याला सहमत नाही म्‍हणून तरुणाने लग्‍नाचे वचन मोडले असेल तर त्‍याने लग्‍नाचे आमिष दाखवून बलात्‍काराचा गुन्‍हा केला, असे मानले जावू शकत नाही, असे निरीक्षण मुंबई उच्‍च न्‍यायालयाच्‍या नागपूर खंडपीठाने नुकतेच नोंदवले. तसेच ३१ वर्षीय तरुणाची लग्नाच्या बहाण्याने तरुणीवर बलात्कार केल्याच्‍या आरोपातून निर्दोष मुक्तता केली.

काय होते प्रकरण ?

एका तरुणीची तिच्‍या बहिणीच्‍या माध्‍यमातून २०१६ संशयित आरोपीबरोबर ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. या काळात दोघांमध्‍ये शारीरिक संबंध प्रस्‍थापित झाले. दोघांच्‍या नात्‍याला तरुणाच्‍या आई-वडिलांचा विरोध होता. लग्‍नाला परवानगी मिळण्‍यासाठी तरुणीने मुलाच्‍या आई-वडिलांची भेट घेतली. मात्र त्‍यांनी लग्‍नास विरोध केला. काही दिवसानंतर संशयित आरोपीच्‍या वडिलांना भेटून तरुणीने लग्‍नाला परवानगी देण्‍याची विनंती केली. मात्र त्‍यांनी या नात्‍याला आपला विरोध कायम असल्‍याचे सांगितले. यानंतर काही दिवसांनी संशयित आरोपीचे लग्न दुसऱ्या तरुणीसोबत झाल्‍याची माहिती तरुणीला मिळाली. तरुणीने संबंधित तरुणाविरोधात लग्‍नाच्‍या आमिषाने बलात्‍कार केल्‍याची फिर्याद दिली. नागपूर पोलिसांनी संशयित आरोपीविरुद्ध बलात्‍कार प्रकरणी ( आयपीसी कलम ३७६(२)(एन) अन्वये) गुन्‍हा दाखल केला.

संशयित आरोपीची उच्‍च न्‍यायालयात धाव

या प्रकरणी संशयित आरोपीविरोधात आरोपपत्र दाखल झाले. सुटकेसाठी त्‍याने सत्र न्यायालयात धाव घेतली. मात्र, सत्र न्यायालयाने आरोपींना खटल्यातून मुक्त करण्यास नकार दिला. यानंतर त्‍याने संपूर्ण फौजदारी कारवाई रद्द करण्‍याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्‍च न्‍यायालयाच्‍या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. आपण तक्रारदार तरुणीसोबत लग्नास तयार होतो; परंतु आपल्‍या आई-वाडिलांनी आमच्‍या नात्‍याला परवानगी दिली नसल्‍याचे त्‍याने याचिकेत नमूद केले होते. यावर न्‍यायमूर्ती महेंद्र चंदवानी यांच्‍या समोर सुनावणी झाली.

संशयिताच्‍या वकिलांनी सादर केले व्हॉट्सॲप चॅट

या प्रकरणी संशयित आरोपींच्‍या वकिलांनी तरुण-तरुणीच्‍या व्हॉट्सॲप चॅट न्‍यायालयात सादर केले. या पुराव्‍यामध्‍ये दोघांमधील संबंध सहमतीने असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले. २०१६ पासून आरोपी तक्रारदार लग्न करण्यास तयार होता; परंतु पीडित तरुणी लग्‍नास तयार नव्हती, हे स्‍पष्‍ट करणारे व्हॉट्सॲप चॅट (संदेश) कडेही त्‍यांनी लक्ष वेधले. तरुणीने लग्‍नास नकार दिल्‍यानंतर काही दिवसांनी तरुणाला चांगली नोकरी मिळाली. यानंतर त्‍याचे लग्‍नही ठरले. यानंतर तक्रारदार तरुणीने त्याच्याविरुद्ध खोटी तक्रार दाखल केली, असा युक्‍तीवाद संशयित आरोपीच्‍या वकिलांनी केला.

शारीरिक संबंधांसाठी लग्नाचे वचन हे एकमेव कारण नव्हते

वकिलांचा युक्‍तीवाद आणि वस्‍तुनिष्‍ठ पुराव्‍याच्‍या आधारे न्‍यायमूर्ती महेंद्र चंदवानी यांनी स्‍पष्‍ट केले की, या प्रकरणी आई-वडिलांची लग्‍नास सहमत नाही, म्‍हणून तरुणाने लग्‍नाचे वचन मोडले असेल तर त्‍याने लग्‍नाचे आमिष दाखवून बलात्‍काराचा गुन्‍हा केला, असे मानले जावू शकत नाही. दोघांमधील शारीरिक संबंध हे सहमतीने होते. शारीरिक संबंधांना परवानगी देण्यामागे लग्नाचे वचन हे एकमेव कारण नव्हते. तरुणीला या संबंधातून होणार्‍या परिणामाची पूर्ण जाणीव होती. तिचे बराच काळ तरुणालाबरोबर संबंध होते. यावरून असा निष्कर्ष निघत नाही की, प्रत्येक प्रसंगी केवळ लग्नाच्या आश्वासनावरच शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. वचन भंग करणे आणि खोटे आश्वासन देणे, यात फरक आहे, असे स्‍पष्‍ट करत उच्च न्यायालयाने संशयित आरोपीची याचिका निकालात काढत आरोपीला खटल्यातून मुक्त केले.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT