Latest

Brazil Political Crisis : ब्राझीलमध्‍ये राजकीय संघर्ष विकोपाला; माजी राष्‍ट्राध्‍यक्ष समर्थकांचा राष्‍ट्रपती भवनासह संसदेवर हल्‍लाबोल

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : ब्राझीलचे माजी अध्यक्ष जैर बोल्सोनारो यांच्या समर्थकांनी रविवारी (दि. ८) रस्‍त्‍यावर उतरत हिंसक प्रदर्शन केले. संसद भवन, राष्‍ट्रपती भवन आणि सुप्रीम कोर्टा परिसरात प्रवेश करत धिंगाणा घातला. २०२१मध्‍ये अमेरिका राष्‍ट्राध्‍यक्ष निवडणूक निकालानंतर डोनाल्‍ड ट्रम्‍प समर्थकांनी अमेरिकेत केलेल्‍या हिंसाचारासारखाच हा प्रकार असल्‍याचे मानले जात आहे. दरम्‍यान, या हिंसाचारामागे माजी अध्‍यक्ष बोल्‍सोनारो हेच जबाबदार आहेत, असा आरोप ब्राझीलचे अध्‍यक्ष लुईझ इनासिओ लुला दा सिल्‍वा यांनी केला आहे.  (Brazil Political Crisis )

राष्‍ट्राध्‍यक्ष निवडणूक निकालानंतर बोल्‍सोनारो समर्थकांचा थयथयाट

ब्राझीलमध्‍ये ३० ऑक्‍टोबर २०२१ रोजी राष्‍ट्राध्‍यक्ष निवडणूक निकाला जाहीर झाला.  बोल्‍सोनारो यांचा पराभव करत दा सिल्‍वा हे राष्‍ट्राध्‍यक्ष झाले. हा पराभव बोल्‍सोनारे समर्थकांच्‍या जिव्‍हारी लागला. निकालानंतर त्‍यांनी देशातील विविध ठिकाणी आंदोलन करत दा सिल्‍वा यांचा निषेध केला होता. बोल्‍सोनारो हे उजव्‍या विचारसरणीचे तर दा सिल्‍वा हे कट्टर डावे मानले जातात. बोल्‍सोनारो यांचे समर्थक सातत्‍याने दा सिल्‍वा यांचा विरोध करत आले आहेत. रविवारी झालेला हिंसाचारालाही याच राजकीय संघर्षाची किनार आहे.

राष्‍ट्राध्‍यक्षांच्‍या निषेधार्थ बोल्‍सोनारो समर्थक पुन्‍हा रस्‍त्‍यावर

अध्यक्ष दा सिल्‍वा यांच्या निषेधार्थ बोल्‍सोनारो समर्थक रविवारी रस्‍त्‍यावर उतरले. त्‍यांनी थेट संसद भवनाकडे कूच केली. येथील सुरक्षा रक्षकांवर हल्‍ला करत संसदेत प्रवेश केला. संसदेत अध्‍यक्षांच्‍या खुर्चीवर भोवती गोळा झालेला जमाव व संसद सभापतीच्‍या डासरवर चढून माईकशी छेडछाड करणाऱ्या आंदोलकांचा व्‍हिडिओ व्‍हायरल झाला आहे. तसेच यामध्ये काही आंदोलक पोलिसांवर हल्‍ला करत असल्याचेही दिसत आहे.आंदोलकांचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्‍ये आंदोलक संसद भवनात प्रवेश करताना. तेथील दरवाजे आणि खिडक्या तोडताना दिसत आहेत. तसेच खासदारांच्या कार्यालयात तोडफोड करत असल्याचेही व्हिडिओमध्ये दिसत आहे. दंगलखोरांना संसद भवन, राष्‍ट्रपती भवन आणि सुप्रीम कोर्टात जाण्यापासून रोखण्यासाठी पोलिसांनी प्रयत्‍न केला.अश्रुधुराच्या नळकांड्या फोडत हिंसक जमावाला पांगविण्‍याचाही प्रयत्‍न केल्‍याचे रॉयटर्स वृत्तसंस्‍थेने म्‍हटलं आहे.

Brazil Political Crisis : अमेरिकेसह संयुक्‍त राष्‍ट्र अध्‍यक्षांनी व्‍यक्‍त केला निषेध

बोल्‍सोनारो समर्थकांनी ब्राझीलमध्‍ये केलेल्‍या हिंसाचाराचा अमेरिकेने तीव्र निषेध केला आहे . लोकशाहीतील संस्‍थांवरील हल्‍ला कधीच खपवून घेतला जाणार नाही, असे अमेरिकेचे परराष्‍ट्र मंत्री अँटोनी ब्‍लिंकन यांनी म्‍हटलं आहे. ब्राझीलमधील लोकशाही संस्‍थांना अमेरिकेचा पूर्ण पाठिंबा आहे, असे ट्विट ज्‍यो बायडेन यांनी केले आहे. ब्राझील हा लोकशाही मूल्‍यांचा आदर करणारा महान देश आहे. या देशातील नागरिकांच्‍या इच्छेचा आणि लोकशाही संस्थांचा आदर केला पाहिजे, असे ट्विट संयुक्‍त राष्‍ट्रांचे (युनो) प्रमुख गुटेरेस यांनीही हल्‍लाचा निषेध केला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT