Latest

Insomnia : महिलांमधील निद्रानाशाचे ‘हे’ थक्क करणारे कारण

Arun Patil

वॉशिंग्टन : तन-मनाच्या विश्रांतीसाठी आणि आरोग्यासाठी सात-आठ तासांची गाढ झोप ही आवश्यकच असते; मात्र अनेकांना झोपेशी संबंधित काही समस्या असतात. एका नव्या संशोधनानुसार पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये निद्रानाशाची समस्या उद्भवण्याचा धोका 60 टक्के अधिक असतो. याचा अर्थ झोपेची तक्रार पुरुषांपेक्षा महिलांमध्ये अधिक असते. त्यामागील एक थक्क करणारे कारण म्हणजे शरीरातील जैविक घड्याळ!

हार्वर्ड, स्टॅनफोर्ड आणि साऊथम्प्टन युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी याबाबतचे संशोधन केले आहे. त्यांना आढळले की, महिलांच्या झोपेचा दर्जा हा पुरुषांच्या तुलनेत बराच खराब असतो. याचे कारण म्हणजे महिलांच्या शरीरातील आंतरिक किंवा जैविक घड्याळ, जे पुरुषांच्या तुलनेत सुमारे सहा मिनिटे वेगाने चालते. वेळेनुसार हे आतील घड्याळ अंतर्गत वातावरणाशी ताळमेळ साधू शकत नाही. त्यामुळे मेंदू आणि शरीरादरम्यानच्या संवादात अडथळे येतात आणि झोप कमी होते. याबाबतच्या संशोधनाची माहिती 'स्लीप मेडिसिन रिव्ह्यूज' या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आली आहे. चयापचयाशी संबंधित आजार, झोप आणि बायोलॉजिकल र्‍हिदम म्हणजेच जैविक लय यांच्याशी संबंधित समस्यांच्या उपचारावेळी जैविक घड्याळाकडे लक्ष द्यावे लागते.

महिलांमध्ये मासिक चक्राच्या बदलाबरोबरही झोपेवर परिणाम होत असतो. 53 टक्के महिलांना मासिक चक्रावेळी रात्री एंग्झायटीचा त्रास होतो, त्यामुळे रात्री झोपमोड होते. निद्रानाशाचा संबंध डिप्रेशन आणि एंग्झायटीशीही आहे. या दोन्ही समस्या पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये दुपटीने अधिक आढळतात. महिलांमध्येच इंसोम्निया अधिक का आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. एका संशोधनात आढळले आहे की, महिलांमध्ये रेस्टलेस लेग सिंड्रोम होण्याची शक्यता अधिक असते. ही एक चेतासंस्थेशी संबंधित समस्या आहे. यामध्ये त्यांना रात्रीच्या वेळी सातत्याने पायांवर काही तरी वळवळल्याचा भास होतो व त्यांना सतत पाय हलवण्याची इच्छा होते. अशा स्थितीत झोपेत अडथळे येतात.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT