मुंबई : पुढारी वृत्तसेवा
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहू येथील बंगल्याच्या बेकायदेशीर बांधकामाचे मोजमाप करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेचे पथक दाखल झाले आहे. यावेळी राणे समर्थक विरोध करण्याची शक्यता असल्यामुळे पोलिसांनी सकाळपासूनच राणे यांच्या बंगल्यासमोर जुहू तारा रोडवर कडक बंदोबस्त ठेवला आहे.
केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या विरोधात शिवसेनेने रणशिंग फुंकले आहे. राणे यांच्या जुहू येथील अधीश बंगल्यातील बेकायदेशीर बांधकामावर कारवाई करण्यासाठी शिवसेनेकडून पालिका प्रशासनावर गेल्या आठवडाभरापासून दबाव येत आहे. त्यामुळे अंधेरी के-पश्चिम विभागाने एक नोटीस गुरुवारी रात्री उशिरा मुंबई महानगरपालिका अधिनियम, 1888 च्या कलम 488 अन्वये बजावली होती. त्यानुसार के-पश्चिम विभाग आणि इमारत प्रस्ताव विभागाच्या अधिकाऱ्यांचे पथक राणे यांच्या बंगल्यात दाखल झाले आहे.
आराखड्यानुसार बंगल्यातील बांधकाम झाले की नाही, याबाबतचा मोजमाप घेण्यात येणार आहे. यावेळी राणेसमर्थक विरोध करण्याची शक्यता असल्यामुळे पालिकेने सांताक्रुझ पोलिस ठाण्याला पत्र देऊन बंदोबस्त देण्याची मागणी केली होती. त्यानुसार राणे यांच्या बंगल्याबाहेर कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. बंगल्यात येणार्या प्रत्येकाची कसून तपासणी करण्यात येत आहे. सकाळी काही कार्यकर्ते जमा झाले होते. मात्र त्यांना पांगवण्यात आले.