Latest

भाजपने जाहीरनाम्यात जुन्या योजनांची व्याप्ती वाढवली

backup backup
नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : भाजपचा बहुप्रतिक्षित जाहीरनामा 'संकल्पपत्र' या नावाने रविवारी सकाळी प्रकाशित करण्यात आला. यामध्ये काही गोष्टींचा नव्याने समावेश केला असला तरी आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री आवास योजना, लखपती दीदी अशा भाजपप्रणित एनडीए सरकारच्या  बहुतांश योजना जुन्याच आहेत. त्यातील काही योजना सुरू ठेवण्याचे तर काही योजनांची व्याप्ती वाढवण्यात येणार आहे.

कोणत्या योजना सुरू राहणार किंवा त्यांची व्याप्ती वाढवणार?

भाजपने मुद्रा योजनेच्या माध्यमातून २० लाखांपर्यंत कर्ज देण्यात येणार असल्याचे सांगितले, पूर्वी या योजनेच्या माध्यमातून १० लाखांपर्यंत दिले जात होते. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आणखी ३ कोटी नवे घर बनवले जातील, यापूर्वी ४ कोटी घरे गरिबांसाठी बनवल्याचे सरकारने सांगितले आहे, ८० कोटी लोकांना मोफत अन्न योजना २०२९ पर्यंत लागू राहील. प्रधानमंत्री उज्वला योजनेतून १० कोटी घरी गॅस कनेक्शन दिले, ही योजनाही पुढे सुरू राहील. प्रधानमंत्री सुर्यघर मोफत वीज योजना प्रभावीपणे राबविली जाईल. 5 जी सेवेचा विस्तार करण्यात येईल. यापूर्वी एक कोटी ग्रामीण महिलांना लखपती दीदी बनवल्याचे सरकारने  सांगितले, आता हे लक्ष्य वाढवून तीन कोटी करणार असल्याचे भाजपने सांगितले. यापूर्वी सुरू असलेल्या आयुष्यमान भारत योजनेत आता सर्व ज्येष्ठ नागरिकांना निशुल्क उपचार प्रदान करण्यात येतील. तृतीयपंथी समुदायाला या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. प्रधानमंत्री स्वनिधी योजनेअंतर्गत ६३ लाख पेक्षा अधिक लोकांना शहरी भागात कर्ज दिले. आता या योजनेतून आता ग्रामीण भागातील फेरीवाले आणि तत्सम लोकांना लाभ देण्यात येईल. रेल्वे सेवेचा विस्तार केला जाणार असून यापूर्वी असलेल्या वंदे भारत ट्रेनसह आधुनिक कोचेस आणि गाड्या वाढवण्यात येतील. प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, भारतात विमानसेवा या योजनांचा विस्तार करण्यात येणार आहे.

विनोद तावडे यांच्या हातात 'सूत्र'संचालन

केंद्रात सत्ताधारी भाजपचा बहुप्रतिक्षित जाहीरनामा 'संकल्पपत्र' या नावाने रविवारी सकाळी प्रकाशित झाला. भाजपच्या 'संकल्पपत्रा'चे प्रकाशन दिल्लीस्थित भाजप मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रमुख उपस्थितीत झाले. दरम्यान, रविवारी कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीपासूनच विनोद तावडे प्रमुख भूमिकेत होते. एकूणच कार्यक्रम व्यवस्थेत विनोद तावडे पुढे होते. कार्यक्रमस्थळी आवश्यक दिशा निर्देश विनोद तावडे संबंधित लोकांना देत होते. भाजपच्या जाहीरनामा समितीमध्येही विनोद तावडे यांचा समावेश आहे. तसेच आजच्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देखील विनोद तावडे यांनीच केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT